वास्को : दिल्लीहून १७१ प्रवाशांना घेऊन शुक्रवारी (दि.१५) दाबोळी विमानतळावर उतरण्यासाठी उड्डाणावर असलेल्या एअर इंडीया एक्सप्रेस विमानात अज्ञात बॅग आढळल्याने प्रवाशात आणि दाबोळी विमानतळ परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. दिल्लीहून आलेले विमान सुरक्षेच्या दृष्टीने ‘आयझोलेटड बे’ वर उतरवून प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेल्यानंतर बॅग तपासली असता त्यात फक्त कपडे असल्याचे उघड झाले. ते विमान गोव्यात येण्यापूर्वी दिल्लीला प्रवाशांना घेऊन उतरले असता तेथे एका प्रवाशाने चुकून आपली बॅग विमानातच ठेऊन तो विमानातील एका ‘क्रु’ ची बॅग घेऊन गेल्याचे उघड झाल्यानंतर दाबोळी विमानतळावर निर्माण झालेले भितीचे वातावरण दूर झाले.
दाबोळी विमानतळावरील विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास ती घटना घडली. दिल्लीहून दाबोळी विमानतळावर १७१ प्रवाशांना घेऊन येण्यासाठी उड्डाणावर असलेल्या एअर इंडीया एक्सप्रेस विमानात अज्ञात बॅग असल्याचे विमानातील एका ‘क्रु’ (विमान कर्मचारी) ला दिसून आले. विमानात अज्ञात बॅग आढळल्याने निर्माण झालेल्या धोक्याबाबत ‘क्रु’ ने विमानाच्या केप्टन बरोबरच दाबोळी विमानतळावरील विविध सुरक्षा यंत्रणांना माहीती दिली. दाबोळीवर येणाऱ्या विमानात अज्ञात बॅग असल्याची माहीती सुरक्षा यंत्रणांना मिळताच ‘बॉम्ब ट्रेट रिव्हीव समिती’ ने बैठक घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने काय पावले उचलवावी त्याबाबत चर्चा केली. विमान गोव्यात पोचल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ते दाबोळी विमानतळाच्या ‘आयझोलेटेड बे’ वर उतरविले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवाशी आणि विमानातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी नेले. नंतर विमानाची आणि त्या अज्ञात बॅगेची तपासणी केली असता तेथे धोकादायक असे काहीच नसल्याचे आढळून आले. त्या अज्ञात बॅगेत कपडे इत्यादी साहीत्य होते. ती अज्ञात बॅग कोणाची त्याबाबत तपासणी केली असता ती बॅग दिल्लीला उतरलेल्या एका प्रवाशाची असून त्यांने चुकून स्व:ताची बॅग विमानात ठेऊन तो एका ‘क्रु’ ची बॅग घेऊन गेल्याचे उघड झाल्याने भितीचे वातावरण दूर झाले.
...अन् विमानाला इंधन गळतीदाबोळी विमानतळावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या अन्य एका घटनेत प्रवाशांना घेऊन दुबईला जाणार असलेल्या एका विमानात इंधन गळती झाल्याचे उघड झाले. दाबोळी विमानतळावरून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता एअर इंडीया एक्सप्रेसचे विमान १४९ प्रवाशांना घेऊन दुबईला जाणार होते. प्रवाशांना घेऊन उड्डाण करण्यापूर्वी विमानाची तपासणी केली असता विमानातून इंधन गळती होत असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्या विमानाने उड्डाण रद्द करून विमानाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले. विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार शनिवारी (दि.१६) उशिरा संध्याकाळी विमानाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून ते विमान शनिवारी उशिरापर्यंत १०७ प्रवाशांना घेऊन दुबईला जाण्यासाठी रवाना होईल.