पणजी : उपसभापती अनंत शेट यांचा येत्या शुक्रवारी २८ रोजी मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तार चतुर्थीपूर्वी करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी याआधीच दिले आहेत. तूर्त शेट यांचा समावेश करून उर्वरित महत्त्वाचा खांदेपालट तसेच आणखी एका नव्या मंत्र्याचा समावेश चतुर्थीनंतर करण्याचे आता ठरले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर २८ रोजी गोव्यात येणार आहेत. आणखी एका मंत्र्याला डच्चू देऊन त्याजागी सभापती राजेंद्र आर्लेकर यांचीही मंत्रिपदी वर्णी लावण्याचे नुकतेच केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच अन्य वरिष्ठ नेत्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत ठरले. अन्य मंत्र्यांच्या बाबतीतही मोठा खांदेपालट होऊ शकतो. विधानसभा निवडणूक दीड वर्षावर येऊन ठेपली आहे. त्याआधी भाजप आपली पाळेमुळे बळकट करू पाहात आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणाच्या समावेशाविषयी अथवा खांदेपालटाविषयी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले. तारीखही ठरलेली नसल्याचे ते म्हणाले. विधानसभा अधिवेशनामुळे गेला महिनाभर आपण पक्षकार्याला वेळ देऊ शकलो नव्हतो. त्यामुळे पर्रीकरांच्या उपस्थितीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. पर्रीकर पक्षाचे आयोजन सचिव असताना पक्ष नियोजन तेच सांभाळायचे. त्यामुळे गत सप्ताहात तीन-चार दिवस त्यांच्या उपस्थितीत पक्षाचे निवडक कार्यक्रम झाले, पक्षासंबंधी काही प्रलंबित गोष्टींनाही चालना दिली. मंत्रिमंडळ फे ररचनेचा विषयही त्यात होता, यास त्यांनी दुजोरा दिला. (प्रतिनिधी)
अनंत शेट यांचा मंत्रिमंडळ समावेश २८ रोजी शक्य
By admin | Published: August 24, 2015 2:04 AM