पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडीत दहा महिन्यांत आता प्रथमच विसंवाद सुरू झाला आहे. भाजप व गोवा फॉरवर्ड यांच्यातील संबंधांना प्रथमच तडा गेला आहे. हा संघर्ष वाढला तर येत्या काही महिन्यांत पर्रीकर सरकारच्या स्थिरतेसमोर आव्हान निर्माण होऊ शकते, अशी माहिती मिळाली.
गोवा फॉरवर्ड हा भाजपप्रणीत आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण गोव्याची जागा जिंकायची असेल तर भाजपला गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांची मदत घ्यावीच लागेल. सध्या स्व. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाच्या विषयावरून भाजप व गोवा फॉरवर्ड यांच्यात संघर्ष रंगू लागला आहे. गोव्यातील जनमत कौलावेळी महत्त्वाचे योगदान दिलेल्या स्व. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा गोवा विधानसभेसमोर उभा केला जावा म्हणून मंत्री सरदेसाई यांनी जाहीरपणो मागणी केली होती. मात्र भाजपने मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक घेऊन एक ठराव घेतला व गोवा फॉरवर्डची मागणी फेटाळून लावत मंत्री सरदेसाई याना मोठा धक्का दिला. भाजप व गोवा फॉरवर्ड यांच्यातील नात्याला गेल्या दहा महिन्यांत झालेली ही पहिली जखम आहे. सिक्वेरा यांचा पुतळा नकोच अशी मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व भाजप या दोन्ही पक्षांनी मिळून केल्याने गोवा फॉरवर्ड पक्ष अस्वस्थ बनला. मंगळवारी रात्री गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांसह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सिक्वेरा यांचा पुतळा उभा रहायला हवा अशी मागणी आपण पुढे न्यायची असे या बैठकीत ठरले. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या दि. 19 फेब्रुवारीला सुरू होत आहे. त्यावेळी सिक्वेरा यांचा पुतळा व्हायला हवा असा ठराव जर कुठल्याही पक्षाच्या आमदाराने मांडला तर गोवा फॉरवर्ड पक्ष त्या ठरावाला पाठींबा देईल, असे पक्ष सुत्रांनी सांगितले.
पर्रीकर सरकारकडे सध्या चोवीस आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र यात भाजपचे स्वत:चे फक्त चौदा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव यांचा पाठींबा हा अधिकृत स्वरुपाचा नाही. गोवा फॉरवर्ड पक्षाने जर सरकारमधील आपला सहभाग मागे घेतला तर पर्रीकर सरकार कदाचित कोसळणार नाही. पण सरकारच्या स्थिरतेसमोर मोठे आव्हान निर्माण होईल. यापुढे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला असे झालेले नको आहे. म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटकशी चर्चेसाठी आपण तयार असल्याचे पत्र मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अलिकडेच येडीयुरप्पा याना दिले होते. हा विषय व एकूणच म्हादई पाणीप्रश्न यापुढे जोरदारपणो लावून धरायला व भाजपला त्याबाबत कायम प्रश्न विचारायचे असे गोवा फॉरवर्डने ठरवले आहे.