पणजी : संरक्षण मंत्रिपदी असताना गोव्यातील मासळीच्या जेवणाची आठवण काढणारे आणि आता मुख्यमंत्री असलेले गोव्याचे मनोहर पर्रीकर यांनी आता पुन्हा एका वादाच्या अनुषंगाने माशांची आठवण काढली. आम्ही मासे खाणे बंद करावे काय?, असा सूचक प्रश्न मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पत्रकारांना एक उदाहरण देऊन विचारला.
गोव्यात सिप्लासारख्या मोठ्या उद्योगांना मनुष्यबळाची गरज आहे पण ते उपलब्ध होत नाही, अशी खंत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली व मग ते मासेमारी व माशांच्या विषयावर आले. गोव्यात नुकताच उद्योगांमधील नोकरभरतीचा वाद झाला. सिप्ला उद्योगाने गोव्याबाहेर नोकर भरतीची जाहिरात केली. आता परप्रांतीयांची गोव्याच्या उद्योगात भरती होईल आणि यामुळे गोमंतकीय बेरोजगार युवकांवर अन्याय होईल अशी टीका गोवा फाॅरवर्ड आणि अन्य काही राजकीय पक्षांनी केली.
मुख्यमंत्री पर्रीकर यांना पत्रकारांनी याविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, विषय जसा मांडला जात आहे तसा तो नाही. मुख्यमंत्री म्हणाले की गोव्यात काही मोठ्या उद्योगाना स्थानिक मनुष्यबळ मिळत नाही. सिप्लासारख्या उद्योगाशी आपण चर्चा केली. त्यांच्याकडे सहाशे पदे आहेत पण ही पदे भरण्यासाठी त्यांनी गोव्यात जाहिरात दिली तेव्हा गोमंतकीय मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. त्यामुळे सिप्ला उद्योगाला परप्रांतात जाहिरात द्यावी लागली.
आमच्या गोव्यात मोठ्या उद्योगांना जर पुरेशा प्रमाणात मनुष्यबळच उपलब्ध होत नसेल तर करणार काय असा प्रश्न मुख्यमंत्री पर्रीकर यांनी उपस्थित केला. मग मुख्यमंत्र्यांनी थेट माशांची आठवण काढली. मुख्यमंत्री म्हणाले की गोमंतकीय लोकांकडे ट्राॅलर्स आहेत पण खलाशी म्हणून मासेमारी करण्यासाठी गोमंतकीय युवक जात नाहीत. या ट्राॅलर्सवर बहुतांश मनुष्यबळ हे परप्रांतीयच असते. ते बंद करून आम्ही काय मासे खाणेही बंद करावे काय अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली.