पणजी - तुम्ही डाॅक्टरांनी उपवास करायचा नसतो. तुम्ही उपोषणाला न बसता इस्पितळात जायला हवे. तुमची इस्पितळातील ड्युटी महत्वाची आहे असे आपुलकीचे सल्ले देत गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी गोव्यातील डाॅक्टरांना सक्तीने सोमवारी चहा व खाद्यपदार्थ दिले आणि त्यांचे उपोषण अर्ध्या दिवसातच संपुष्टात आणले.भारतीय वैद्यकीय संघटनेच्या गोवा शाखेने राजभवनसमोर उपोषणात्मक आंदोलन सोमवारी सकाळी सुरू केले होते. साडेअकरा वाजता राज्यपालांनी उपोषणाला बसलेल्या डाॅक्टरांना बोलावून घेतले. तुम्ही उपोषण का करता अशी विचारणा राज्यपालांनी केली. यावेळी डाॅक्टरांनी रराज्यपालांना निवेदन सादर केले. डाॅक्टरांवरील हल्ले थांबावे म्हणून केंद्र सरकारने कायदा कराव्या वगैरे मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या. आमचे लाक्षणिक उपोषण दिवसभर चालेल असे डाॅक्टरानी राज्यपालांना सांगितले. तुमची मागणी मान्य आहे पण तुम्ही हा चहा आणि स्नॅक्स घ्या व उपोषण सोडा अशी सूचना राज्यपालांनी केली. तुम्ही उपोषण करणे योग्य नव्हे असे सांगत राज्यपालांनी सर्व डाॅक्टरांना चहा पिण्यास भाग पाडले व शेवटी उपोषण तिथे संपुष्टात आले. आम्ही राज्यपालांच्या सूचनेचा मान राखला असे डाॅक्टर शेखर साळकर यांनी सांगितले.
...आणि गोव्याच्या राज्यपालांनी अर्ध्या दिवसातच थांबवले डाॅक्टरांचे उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 2:45 PM