पणजी : खाण घोटाळा प्रकरणी माजी मंत्री ज्योकिम आलेमाव व खाणमालक तथा माजी आमदार अनिल साळगावकर यांच्याविरुद्ध विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी गुन्हे नोंदविले. कुर्डे व कुर्पे येथील डोंगर कापून बेकायदेशीरपणे पाच वर्षे खनिजाची लूट केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आलेमाव व कांतिलाल कंपनीचे संचालक अनिल साळगावकर यांनी २००६ ते २०११ या काळात कुर्डे व कुर्पे गावाचा अश्नी डोंगर कापून खनिज उत्खनन सुरू केले. टी. सी. क्रमांक ६०/१९५२ खाली हा भाग येत असून हे वनक्षेत्र आहे. दोन्ही संशयितांकडे वैध खाण लिजही नव्हते आणि वनक्षेत्रात खोदकाम करताना वन खात्याची परवानगीही घेण्यात आली नव्हती, असे खाण खात्याच्या निदर्शनास आले आहे. पूर्णपणे बेकायदेशीरपणे ५ वर्षे सुरू असलेल्या या खाणीमुळे सरकारी तिजोरीला मोठा फटका बसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एसआयटीकडून या प्रकरणी मिनरल कन्सेशन नियम ३७ कलम ४ (१) आणि (१ अ) : खाण व खनिजे कायदा १९५७च्या कलम २१ (१), (२) आणि वन कायदा १९८० कलम २ (३ अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मागील विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाण प्रकरणात अडकलेल्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यात ज्योकिम आलेमाव, प्रफुल्ल हेदे व इतरांचा उल्लेख केला होता. शहा आयोगाच्या तिसऱ्या अहवालात उघड केलेली खाण कंपन्यांनी केलेली २,७४७ कोटींची लूट ६ महिन्यांत वसूल करू, असे आश्वासनही दिले होते. (प्रतिनिधी)
अनिल साळगावकर, ज्योकिमवर गुन्हे
By admin | Published: September 16, 2014 1:15 AM