लोकमत न्यूज नेटवर्कवास्को: गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या (दि. ५) दिना पर्यंत साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजप उमेदवार अॅड. अनिता थोरात यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्या बिनविरोध निवडून येण्याच्या दिशेने पोचल्या आहेत. शुक्रवारी (दि. ६) अर्जांची छाननी होणार असून अतिना थोरात यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित होणार आहे.साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघ महीलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला असून बुधवारी (दि. ४) अनिता थोरात यांनी भाजप वरून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अनिता थोरात पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो यांच्या समर्थक असून त्यांच्याविरुद्ध साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून अन्य कोण उमेदवारी भरतो याच्यावर सर्वांचे लक्ष टीकून राहीले होते. कॉग्रेस पक्षाने उज्वला नाईक यांचे नाव साकवाळ जिल्हा पंचायत निवडणूकीला जाहीर केले होते. गुरूवारी (दि.५) दुपारी १ वाजे पर्यंत उमेदवारी भरण्याचा शेवटचा वेळ होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत अनिता थोरात वगळता इतर कुठल्याच उमेदवाराचा अर्ज आला नसल्याने त्यांची साकवाळ जिल्हा पंचायत निवडणूकीत बिनविरोध निवड होणार असल्याचे एकंदरीत निश्चित झाले आहे. शुक्रवारी अर्जांची छाननी होणार असून यात अनिता थोरात यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे. भाजप उमेदवार अनिता थोरात यांच्याविरुद्ध निवडणूकीच्या रिंगणात कॉग्रेस पक्षाने उज्वला नाईक यांना उतरवणार असल्याचे घोषीत केले होते, मात्र त्यांनी शेवट पर्यंत उमेदवारी अर्ज भरला नसल्याने या मागचे कारण काय अशी चर्चा साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातील मतदारात सुरू झाली आहे. पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो यांच्या समर्थक अनिता थोरात यांना भाजप ने उमेदवारी जाहीर केल्याने कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना काही प्रमाणात नाराज झाल्याचे मागील दिवसात दिसून आले होते. तसेच भाजप पक्षातील निलम नाईक यांना साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने त्याही काही प्रमाणात नाराज झाल्याचे दिसून आले असून अनिता थोरात यांच्याविरुद्ध आपण उमेदवारी भरणार असा दावा त्यांनी केला होता. दावा केला असला तरी त्यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत उमेदवारी अर्ज भरला नसल्याने याबाबतही मतदारात चर्चेला उत आल्याचे दिसून आले आहे. साकवाळ जिल्हा पंचायतीतून अनिता थोरात यांच्या अर्जाबरोबरच अन्य दोन ‘डमी’ अर्ज दाखल करण्यात आले असून अनिता थोरात यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे एकंदरीत निश्चित झाले आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छानती करण्यात येणार असून अनिता यांचा अर्ज मान्य झाल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित होणार आहे.अनिता थोरात यांचा बिनविरोध विजय होणार असल्याचे एकंदरीत निश्चित झाल्याने निवडणूकी पूर्वीच गोव्यात जिल्हा पंचायत निवडणूकीत भाजप ने आपले विजयाचे खाते उघडल्याचे दिसून येते. पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो यांच्या समर्थक अनिता थोरात यांचा विजय एकंदरीत निश्चित झाल्याने पत्रकारांनी गुदिन्हो यांना संपर्क केला असता साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातील नागरीकांनी आपल्यावर विश्वास दाखवून अनिता थोरात यांना बिनविरोध निवडल्याचे सांगितले. गोव्यात भाजप ने भरारीने विकास केलेला असून येणाऱ्या काळात होणाºया जिल्हा पंचायत निवडणूकीतही मतदार भाजपलाच बहुमताने विजयाचा कौल देणार असल्याचा विश्वास गुदिन्हो यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला. दरम्यान अनिता थोरात यांनी बिनविरोध विजयाच्या दिशेने वाटचाल केल्याने व या जिल्हा पंचायत निवडणूकीत भाजपला विजयाचे खाते उघडून दिल्याने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले असल्याची माहीती सूत्रांनी दिली.
साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून अनिता थोरात बिनविरोध विजयाच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 7:13 PM