सुशांत कुंकळयेकर
मडगाव - ड्रग्स व्यवसाय आणि पर्यटकांवर होणारे अत्याचार यामुळे अंजुणा-मोरजी हा उत्तर गोव्यातील किनारपट्टी भाग जागतिक पर्यटन नकाशावर बदनाम झालेला आहे. शांत भासणारा दक्षिण गोव्यातील काणकोणचा किनारपट्टी भागही त्याच वाटेवर तर जात नाही ना असा प्रश्न गुरुवारी पाळोळे समुद्र किनाऱ्याजवळ पहाटेच्यावेळी एका 48 वर्षीय ब्रिटीश महिलेवर झालेल्या बलात्कारामुळे निर्माण झाला आहे. या किनारपट्टी भागातील विदेशी पर्यटक महिलांवर होणारा हा दुसरा लैंगिक अत्याचाराचा प्रकार आहे.
गुरुवारी पहाटे काणकोण रेल्वे स्थानकावरुन पाळोळे समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या या ब्रिटीश महिलेवर एका अज्ञाताने बलात्कार करुन तिच्याजवळ असलेले 20 हजार रुपये पळवले होते. यापुर्वी याच पाळोळेत 25 मे रोजी समुद्रात आंघोळ करताना एका 13 वर्षीय जर्मन मुलीचा एका भारतीय पर्यटकाकडून विनयभंग करण्यात आला होता. याशिवाय याच तालुक्यातील पाटणो येथील किनारपट्टी भागात यंदा दोन ब्रिटीश पर्यटकांना मृत्यूही आला होता. त्यापैकी एक घटना 14 जानेवारीला घडली होती. तर दुसरी घटना 9 फेब्रुवारीला घडली होती. पहिल्या घटनेत मायकल वेल्स या 50 वर्षीय पर्यटकाला तर दुसऱ्या घटनेत कॅजी लुईस या 27 वर्षीय ब्रिटीश युवकाला संशयास्पद मृत्यू आला होता.
मागच्या वर्षीही काणकोणची ही किनारपट्टी डॅनियली मॅक्लॉग्लीन या 30 वर्षीय आयरीश युवतीच्या खुनामुळे आंतरराष्ट्रीय नकाशावर बदनाम झाली होती. सदर युवतीचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कारही करण्यात आला होता. या प्रकरणात काणकोण पोलिसांनी विकट भगत या स्थानिक युवकाला अटक केली होती. त्यापूर्वी 2015 मध्ये याच पाटणे भागात फेलिक्स दहाल या 24 वर्षीय स्वीडीश युवकाला अशाचप्रकारे संशयास्पद मृत्यू आला होता. तब्बल एका वर्षानंतर ही घटना खुनाचा प्रकार म्हणून नोंद झाली होती. मात्र या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यास स्थानिक पोलिसांना अपयश आल्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपविण्यात आले होते.दक्षिण गोव्यातील एकेकाळी शांत समजल्या जाणाऱ्या काणकोणात पर्यटकांवर होणारे हे वाढते अत्याचार चिंतेची बाब असल्याचे मत महिला हक्क चळवळीत कार्यरत असलेल्या बायलाचो एकवोट या संघटनेच्या आवदा व्हिएगस यांनी व्यक्त करताना असे प्रकार थांबण्यासाठी गोवा पोलिसांनी ‘स्पेशल व्हिजीलन्स’ विभाग सुरू करण्याची गरज व्यक्त केली.
2018 वर्षात विदेशी पर्यटकांवर काणकोणात झालेल्या दोन लैंगिक अत्याचाराशिवाय संपूर्ण गोव्यात दहा विदेशी पर्यटकांना गोव्यात असताना मृत्यू आला असून त्यात उत्तर गोव्यातील हरमल या किनारपट्टीवर प्रिन्स ओबोजो या 27 वर्षीय नायजेरियन युवकाचा झालेल्या खूनाचाही समावेश आहे. अंमली पदार्थाच्या व्यवहाराच्या वादातून समव्यावसायिकांकडून हा खून झाला होता. याशिवाय जानेवारी महिन्यात अंजुणा येथे स्टीवन्स सिनारीस या 57 वर्षीय जर्मन पर्यटकाला मृत्यू आला होता. 27 फेब्रुवारी रोजी ऑलेक्झांडरा या 37 वर्षीय युक्रेनियन महिलेला तुये या पेडण्यातील किनारपट्टीवर मृत्यू आला होता.
30 मार्च रोजी अॅना डेमालिया या 32 वर्षीय रशियन महिलेला शापोरा येथे वाहन अपघातात मृत्यू आला होता. नोव्हेंबर महिन्यात पेडण्यातील मांद्रे किनारपट्टीवर दोन वेगवेगळ्या घटनात दोन रशियन नागरिकांना मृत्यू आला होता. त्यात 2 नोव्हेंबर रोजी गाल्कीन दिमिस्त्रोव्ह या 39 वर्षीय इसमाच्या संशयास्पद मृत्यूबरोबरच 16 नोव्हेंबर रोजी क्लानिया कुलिनोव्हा या 60 वर्षीय रशियन महिलेला बुडून मृत्यू आला होता. 28 नोव्हेंबर रोजी सिव्हिलिबिया एल्का या 30 वर्षीय रशियन महिलेला अंजुणा येथे तर 13 डिसेंबर रोजी दाबोळी विमानतळावर आपल्या मायदेशी परत जाण्यासाठी आलेल्या आंतोन कुजनोस्तोव्हा या 30 वर्षीय रशियन पर्यटकाचा विमानतळावरच हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला होता.