लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बुधवारी रात्री उशिरा गोव्यात दाखल झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पक्षाचे आमदार युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा व प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याशी चर्चा केली. लोकसभेसाठी उमेदवार लवकर जाहीर करावा, अशी विनंती राहुल गांधी यंच्याकडे केली आहे.
खासगी भेटीवर गोव्यात आलेले राहुल गांधी काल, गुरुवारी सकाळी दिल्लीला परतले. बुधवारी रात्री त्यांनी आमदारांशी वार्तालाप केला. हळदोणेचे आमदार कालुस फेरेरा उपस्थित नव्हते. आमदार व प्रदेशाध्यक्षांकडे अल्पकाळाच्या वार्तालापात राहुल गांधींनी पक्ष मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही चर्चा केली. गोव्यातील राजकीय स्थिती त्यांनी जाणून घेतली.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चर्चा झालेली आहे. तसेच राहुलजींना आम्ही गोव्यातील राजकीय परिस्थितीची पूर्ण माहिती दिलेली आहे.
सरकारी वाहन नाकारले
आमदार फेरेरा हे राहुलजींचे स्वागत करण्यासाठी दाबोळी विमानतळावर गेले होते. विमानतळावर उतरताच सरकारी वाहन नाकारून प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या खासगी वाहनातून त्यांनी हॉटेलपर्यंत जाणे पसंत केले.