लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आपचे संयोजक अॅड. अमित पालेकर यांनी भाजपवर खोटे आरोप करण्यापेक्षा कुठल्या भाजपच्या नेत्याने पक्षात प्रवेश करण्याचा दबाव आणला, त्याचे नाव जाहीर करावे, असे आव्हान शुक्रवारी भाजपने पत्रकार परिषदेत दिले.
बाणस्तारी अपघातातील कथित चालक बदलण्याच्या प्रकरणात क्राईम बँचने आपचे संयोजक अॅड. अमित पालेकर यांना गुरुवारी ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी भाजप प्रवेशास नकार दिल्याने आपल्यावर खोटे आरोप करून कारवाई करण्यात आली असा दावा पालेकर यांनी केला होता. याबाबत भाजपचे माजी मंत्री दिलीप परुळेकर, सरचिटणीस व माजी आमदार दयानंद सोपटे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळून लावले.
माजी आमदार सोपटे म्हणाले, 'अमित पालयेकर हे भाजपवर खोटे आरोप करीत आहेत. भाजप हा मोठा पक्ष आहे. अनेक राजकीय नेते पक्षात येत आहे. पण कोणालाच जबरदस्तीने आणलेले नाही. जर पालेकर यांना कुठल्या नेत्याने जबरदस्तीने यायला सांगितले असेल तर त्याचे नाव त्यांनी जाहीर करावे. विनाकारण पक्षाचे नाव बदनाम करू नये.'
माजी आमदार सोपटे म्हणाले, 'अमित पालेकर यांनी अपघातात ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देणे गरजेचे होते. पण त्यांनी याकाळातही राजकारण केले. पालयेकर हे भाजपवर आरोप करुन पक्षाची बदनामी करत आहे. या प्रकरणात जातीयवाद करुन भंडारी समाजाचे नाव जोडले जात आहे' असे ते म्हणाले.
'अमित पालेकर हे स्वत वकील आहेत. कोणत्याही व्यक्तीला पोलिस कुठल्याही पुराव्याशिवाय अटक करत नाही हे त्यांना ठाऊक आहे. या गुन्ह्यात त्यांचा समावेश असल्याने क्राईम ब्रँचने अटकेची कारवाई केली आहे', असे दिलीप परुळेकर यांनी सांगितले.
पक्ष संपविण्यासाठी भाजपचे षडयंत्र : आप
पणजी : राज्यात आम आदमी पक्षाची वाढती लोकप्रियता भाजपला सहन होत नाही पाहत येत नसल्याने भाजपकडून अशी षडयंत्रे राबिवली जात आहे. अँड. अमित पालेकर यांना बदनाम करुन आप पक्ष गोव्यात संपविण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप आपचे नेते वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. नाईक यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेवेळी आपच्या नेत्या अॅड. प्रतिमा कुतिन्हो, अॅड. सुरेल तिळवे व अन्य सदस्य उपस्थित होते. वाल्मिकी नाईक म्हणाले, आम आदमी पक्षाला अल्प काळात गोव्यात लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे भाजप पक्ष घाबरला असून अशी षडयंत्रे रचली जात आहे. पालेकरांची खोट्या आरोपाखाली सतावणूक केली जात आहे. पण, सर्व गोमंतकीय जनतेला खरे काय ते माहीत आहे.'