पणजी - हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि.,चा हेलिकॉप्टर दुरुस्ती प्रकल्प गोव्यातच उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे सांगितले आहे.
दिवंगत मनोहर पर्रीकर हे केंद्रीय संरक्षणमंत्री असताना त्यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये हा प्रकल्प जाहीर केला होता. गोव्यातील सत्तरी तालुक्यातील होंडा येथे हा प्रकल्प येणार होता परंतु काम पुढे गेलेच नाही. नाईक म्हणाले की, सरकारने या प्रकल्पासाठी भूसंपादन केले असून त्याचा पाठपुरावा मी करणार आहे. बंगळुरू येथील हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि तसेच साफ्रान हेलिकॉप्टर इंजिन्स या फ्रेंचे कंपनीने हातमिळवणी करुन हा प्रकल्प आणण्याचे निश्चित केले होते. आधीचा करार वगैर असल्यास तो रद्द करुन दुसरा करावा लागेल किंवा दुसरी कंपनी शोधावी लागेल, असे ते म्हणाले.
या प्रकल्पात एकूण 170 कोटी रुपये गुंतवणूक येणार होती. टप्प्याटप्प्याने उभयपक्षी ही गुंतवणूक होणार होती. साफ्रान डिझाईनची हेलिकॉप्टर इंजिन भारतील सैन्य दलात मोठ्या प्रमाणात वापरली जातात. अशी 1000 इंजिन्स सध्या आहेत. यात टीएम 333 ची 250 आणि 250 ‘शक्ती’ इंजिने सैन्य दलाकडे आहेत.