पणजी : कोमुनिदाद जमिनींमधील अनधिकृत घरे कायदा दुरुस्ती आणून कायदेशीर करण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेली घोषणा ही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निव्वळ राजकीय नौटंकी असल्याची टीका हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी केली आहे.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे सरकार लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक कुटुंबे पिढ्यान पिढ्या कोमुनिदाद जमिनींमध्ये राहत आहेत. जमिनींची किंमत मोजण्यासही ही कुटुंबे तयार आहेत. सरकारने याबाबत अवश्य तोडगा काढावा. परंतु कोमुनिदाद किंवा सरकारी जमिनींमधील अतिक्रमणांना रान मोकळे करू नये. लोकप्रिय विधाने करण्याचे सरकारने सोडून द्यावे.'
कार्लुस पुढे म्हणाले की, ' सरकारची ही निव्वळ पोकळ आश्वासने आहेत. लोकसभा निवडणूक होऊनही जाईल. परंतु घरे काही कायदेशीर होणार नाहीत, हे जनतेने ध्यानात ठेवावे.''वाहनावरून स्टंट करणाऱ्यांविरुद्धखूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंदवा'दरम्यान, वाहनावरून स्टंट करणाऱ्यांविरुद्ध भ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ खाली खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी हळदोणेंचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी केली आहे.
गोव्याचे माजी ॲडवोकेट जनरल म्हणाले की, स्टंट करून दुसऱ्याच्या जीविताला धोका पोहोचवणे म्हणजे खुनाचा प्रयत्न करण्यासारखेच आहे. त्यामुळे वरील कलम लावून कारवाई करणे आवश्यक आहे.'दरम्यान, एका प्रश्नावर ते म्हणाले की,' सार्वजनिक ठिकाणी कर्णकर्कश आवाजात संगीत वाजवणाऱ्यांना कायद्याचा हिसका दाखवला पाहिजे.'