पणजी : राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये अजुनही कोविडचे १०० सक्रिय रुग्ण आहेत. काही आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात कोविड रुग्ण संख्या शून्य झाली तर काही ठिकाणी फक्त एक किंवा दोन रुग्ण आहेत पण सर्वच ग्रामीण भागांचा विचार केला तर तिथे अजून १०० सक्रिय कोविड रुग्ण आढळून येत आहेत.
वाळपई रुग्णालयाच्या क्षेत्रात कोविड रुग्णांची संख्या शूून्य झाली आहे. तिथे ९० टक्के ग्रामीण भागच आहे. मडकई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात १०० टक्के ग्रामीण भाग येतो. तिथेही रुग्ण संख्या शून्य झाली आहे. मये, कोलवाळ, कासारवर्णे आदी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात रुग्ण संख्या केवळ दोन किंवा तीन आहे. मात्र राज्यातील उर्वरित सर्व ग्रामीण भागांतील आकडेवारीचा अभ्यास केला तर तिथे अजुनही शंभर कोविड रुग्ण दिसून येत आहेत.
आरोग्य खात्याच्या बुलेटिनमधील अधिकृत आकडेवारी जर अभ्यासली तर पेडणे आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात आठ सक्रिय रुग्ण आहेत. साखळीरुग्णालयाच्या क्षेत्रात ९० टक्के ग्रामीण भाग येतो. तिथे रुग्ण संख्या सात आहे. शिवोली आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात रुग्ण संख्या १९ आहे. हळदोणा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात १०० टक्के ग्रामीण भाग येतो. तिथे ११ सक्रिय कोविड रुग्ण आहेत. बेतकी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात सहा रुग्ण आहेत. धारबांदोडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात १०० टक्के ग्रामीण भाग आहे व तिथे अजून बारा रुग्ण आहेत. बाळ्ळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात सात तर काणकोण आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात अजून सतरा सक्रिय कोविड रुग्ण आहेत. सांगे आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात चार रुग्ण आहेत.
८० टक्के रुग्ण शहरी भागात
सुमारे साडेचारशे ते पाचशे कोविडग्रस्त हे शहरी भागांतच सध्या आहेत. पर्वरीच्या उपनगरात ३५ रुग्ण आहेत. म्हापसा, पणजी, मडगाव, फोंडा, कांदोळी, वास्को याच भागांमध्ये एकूण सक्रिय रुग्णांपैकी साधारणत: ८० टक्के रुग्ण आहेत. चिंबल, म्हापसा, पणजी, मडगाव येथे रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत नाही.
हे रुग्ण कोण ?
१ जानेवारी रोजी तिथे किती रुग्ण होते व आता किती रुग्ण आहेत याचा अभ्यास केला तर त्या चार ठिकाणी रुग्ण संख्या जास्त कमी होत नाही हे स्पष्ट होत आहे. १ जानेवारीला पणजीत ६७ रुग्ण होते व आता ४८ आहेत. १ जानेवारीला म्हापसा व परिसरात ३० रुग्ण होते व आता ३८ आहेत. चिंबलला त्यावेळी ४५ रुग्ण होते व आता ४३ आहेत. मडगावला १ जानेवारी रोजी ९७ रुग्ण होते व आता ८६ आहेत. हे रुग्ण स्थानिक, स्थलांतरित मजुर की पर्यटक की अन्य राज्यांतून किंवा विदेशातून परतलेले गोमंतकीय आहेत असा प्रश्न अभ्यासकांना पडला आहे.