- सद्गुरू पाटील
पणजी : गोव्यातील बांबोळी (Goa Government Hospital) येथील सर्वात मोठ्या सरकारी इस्पितळात ऑक्सिजनचा (Oxygen Shortage) नीट पुरवठा होत नसल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास २६ जणांनी प्राण सोडले असताना बुधवारीही पहाटे देखील दोन ते सहा या वेळेत २१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. (Another 21 corona patient died due to shortage of Oxygen in Goa.)
ऑक्सिजनअभावी मृत्यू होणार नाही याची काळजी सरकार घेईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळीच बांबोळीच्या इस्पितळाला भेट देऊन जाहीर केले होते. रुग्णांपर्यंत ऑक्सिजन सिलिंडर वेळेत पोहचत नाही असे मुख्यमंत्री सावंत यांनी मान्य करत सिलिंडर पुरवठादाराला इशारा दिला होता. सोमवारी मध्यरात्रीनंतर चार तासांत २६ गोमंतकीयांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांनी इस्पितळाला भेट देऊन इस्पितळात सिलिंडर संख्या वाढवली जाईल, असे देखील स्पष्ट केले होते.
तथापि मंगळवारी मध्यरात्रीनंतर बांबोळीच्या इस्पितळातील १२२ क्रमांकाच्या वार्डमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याच्या तुटवड्याची समस्या निर्माण झाली. रुग्णांना ऑक्सिजन मिळेनासा झाला. यामुळे रुग्णांच्या काही नातेवाइकांनी आरोग्य मंत्र्याना व्हॉट्सअॅप संदेश देखील पाठवले व मदतीची विनंती केली. मात्र, ऑक्सिजन न मिळाल्याने २१ रुग्ण चार तासांत दगावले. मध्यरात्री नंतर ऑक्सिजन समस्या का निर्माण होते व बळी का जातात याची न्यायालयाने चौकशी करून घ्यावी, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारीच जाहीरपणे सांगून सरकारमध्ये खळबळ उडवून दिली होती.
मुख्यमंत्र्यांचे काय म्हणणे होते?मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना थेट सांगितले की, सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता नाही, परंतु रुग्णांपर्यंत हा वेळेत पोहोचत नाही. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे व्यवस्थापन नीटपणे होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आक्षेप घेतला. राणे म्हणाले, गैरव्यवस्थापन वगैरे होत नाही, मुख्यमंत्र्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. गोव्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा आहे. जिथे १२०० सिलिंडर हवे तिथे फक्त ४०० मिळत आहेत. पहाटे चार तासांमध्ये जे २६ मृत्यू झाले, त्याची उच्च न्यायालयाने चौकशी करावी.