मडगाव: लॉकडाऊन चालू असतानाही म्हापसा अर्बन बँकेचा परवाना रिसर्व्ह बँकेने रद्द केल्यामुळे तीच वाट चालणाऱ्या मडगाव अर्बनचे काय होणार ही चिंता गुंतवणूकदारांना सतावीत होती मात्र आरबीआयने बँकेची मुदत आणि तीन महिन्यांनी वाढविल्याने तीन महिन्याचे अतिरिक्त सलाईन मिळाले आहे.
आरबीआयने घालून दिलेली मुदत 2 मे ला संपत होती. मंगळवारी आरबीआयने नवीन परिपत्रक जारी करताना ही मुदत 2 ऑगस्ट पर्यंत वाढविली आहे. सध्या या बँकेतून गुंतवणूक दारांना 30 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येते.
मडगाव अर्बन बँक दिवळखोरीच्या मार्गावर असल्याने एका वर्षांपूर्वी आरबीआयने तिच्यावर निर्बंध घातले होते. या बँकेत हजारो लोकांच्या कोट्यवधी रुपये अडकले आहेत. या संदर्भात बँकेचे सरव्यवस्थापक किशोर आमोणकर याना विचारले असता, मडगाव अर्बन ठाणे सहकारी बँकेत विलीन करण्याची बोलणी चालू आहेत मात्र सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर ही बोलणी काही काळासाठी थांबली आहेत. पण यासंबधी यशस्वी तोडगा काढला जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.