पणजी : म्हादई पाणीप्रश्नी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा आणि गोमंतकीयांविरुद्ध कृत्य केले आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक डोळ्य़ांसमोर ठेवून पर्रीकर यांनी गोव्याच्या हितावर पाणी सोडले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक व आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी शुक्रवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केली. तसेच काँग्रेस पक्ष याविरुद्ध आंदोलन छेडील असाही इशारा रेजिनाल्ड यांनी दिला. लवादासमोर कोटय़वधी रुपये आतापर्यंत म्हादई पाणी प्रश्नी गोवा सरकारने खर्च केले असून ज्येष्ठ वकील आत्माराम नाडकर्णी यांनी स्वत:च्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा द्यावा अशीही मागणी काँग्रेसने केली.
कर्नाटकची यंत्रणा म्हादई पाण्याच्या प्रवाहावर बेकायदा पद्धतीने बांधकाम करत आहे. ते मोडून टाकावे अशी मागणी गोवा सरकारने लवादासमोर करावी, अशी मागणी नाईक यांनी केली. म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देऊ नये. लवादासमोर विषय असताना पर्रीकर यांनी कर्नाटकशी बोलणी करण्याची काय गरज आहे असा प्रश्न नाईक यांनी केला. कर्नाटकचा डाव यशस्वी होऊ द्यावा असे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात असेल तरच ते बोलणी करतील. त्यांनी कर्नाटकशी बोलणी करण्याचे परस्पर स्वत: ठरवून टाकले व तसे पत्रही कर्नाटकला देऊन गोवा व गोमंतकीयांविरुद्ध पर्रीकर यांनी कृती केली आहे. नाडकर्णी हे लवादासमोर गोव्याची बाजू एवढी वर्षे मांडत आले पण गोवा सरकारने म्हादईप्रश्नी राजकीय लाभासाठी त्यांच्या पाठीत सुरा खुपसला असा अर्थ होतो. नाडकर्णी यांना ग्राहकाने म्हणजे गोवा सरकारने फसवले असे कायद्याच्या भाषेत नाईक यांनी नमूद करून याबाबत नाडकर्णी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
रेजिनाल्ड म्हणाले, की म्हादईच्या पाण्याच्या विषयावर आम्ही शांत बसणार नाही. कर्नाटकला म्हादईचे पाणी देण्याचा अधिकार गोवा सरकारला नाही. आम्ही या विषयावरून रस्त्यावर उतरू. लवकरच काँग्रेस विधिमंडळ पक्ष आणि प्रदेश काँग्रेस समितीची बैठक होईल व पुढील दिशा ठरविली जाईल. कर्नाटकला म्हादईचे पाणी वळविता येऊ नये म्हणून लवादासमोर गेली अनेक वर्षे सरकारने प्रचंड पैसा खर्च केला आणि आता अचानक कर्नाटकमधील निवडणुका जिंकण्यासाठी र्पीकर म्हादईचे पाणी काढून कर्नाटकला देणो तत्वत: मान्य करतात हे अत्यंत धक्कादायक आहे. लोक सरकारला माफ करणार नाहीत.