पणजी : बांधकाम खात्यात पंप आॅपरेटर तसेच तत्सम काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी असहकाराचे अस्त्र उगारले असून ‘पाणीबाणी’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. २७ जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास कोणत्याही क्षणी संपावर जाऊन पाणीपुरवठा बंद पाडू, असा इशारा देण्यात आला आहे. या कंत्राटी कामगारांची आमसभा बुधवारी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झाली. काँग्रेस विधिमंडळ प्रवक्ते आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आमसभेला उपस्थिती लावून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून येत्या विधानसभा अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठविण्याची ग्वाही कामगारांना दिली आहे. सुमारे ७५0 कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असल्याची तक्रार आहे. आमसभेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना गोवा कामगार महासंघाचे नेते अजितसिंह राणे म्हणाले की, तोडग्यासाठी सरकारला याआधीही १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती; परंतु काहीच झाले नाही. महिना साडेचार हजार रुपये इतके अल्प वेतन त्यांना दिले जाते. गेले सात-आठ महिने त्यांना पगार मिळालेला नाही. सरकार मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. २७ जुलै रोजी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी बांधकाममंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावून ठोस असे लेखी आश्वासन दिले तर ठिक; नपेक्षा त्यानंतर कोणत्याही क्षणी आंदोलन सुरू होईल. बाराही तालुक्यांमध्ये मामलेदार, उपजिल्हाधिकारी कार्यालयांसमोर कामगार निदर्शने करतील. पंप आॅपरेटर्स काम करणार नाहीत त्यामुळे लोकांना पाणी मिळू शकणार नाही. आमसभेत स्वाती केरकर, युवा नेता सिद्धेश भगत, बांधकाम कर्मचारी संघटनेचे सचिव सुरेश नाईक यांचीही भाषणे झाली. (प्रतिनिधी)
सोमवारनंतर कोणत्याही क्षणी राज्यात ‘पाणीबाणी’ आंदोलन!
By admin | Published: July 23, 2015 2:06 AM