गोव्यात भाजपा, काँग्रेसकडून राजकीय नाटकाचा बाजार - आप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 02:01 PM2018-09-19T14:01:30+5:302018-09-19T14:02:18+5:30
राज्यात भाजपा, काँग्रेसकडून राजकीय नाटकाचा बाजार मांडलेला आहे.
पणजी : राज्यात भाजपा, काँग्रेसकडून राजकीय नाटकाचा बाजार मांडलेला आहे. प्रशासन पूर्णपणे ठप्प असून सरकार कोलमडले आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रांतील मध्यस्थी लोकांची चलती आहे. एकप्रकारे हीच मंडळी सरकारी खाते सांभाळत असल्याचा आरोप आपचे गोवा निमंत्रक एल्विस गोम्स यांनी केले. बुधवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदीप पाडगावकर उपस्थित होते.
भाजपा, काँग्रेस व इतर प्रादेशिक पक्षाकडून जो राजकीय खेळ चालला आहे. तो जनहीतच्या विरोधात आहे. राजकारण करा पण लोकांचे हित सांभाळा. गोव्यात गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा उत्सव असून सध्या अनेक गावात, शहरांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. तसेच विजेच्या लंपडावाने लोक हैराण झाले आहेत. लोक रस्त्यांवर येऊन निदर्शने करत आहेत. मात्र याकडे सरकार डोळेझाक करत असल्याचं एल्विस गोम्स म्हणाले.
सुरुवातीला भाजपाकडून काँग्रेसवर निशाणा साधला जायचा की काँग्रेस पक्ष हा हायकमांडचे कटपुतलीवर नाचतो. काँग्रेसला दिग्विजय सिंह, डॉ. ए. चेल्लाकुमार यासारख्या नेत्यांची त्यांना गरज भासते. पण सध्या भाजपाची सुद्धा तिच परिस्थिती झालेली आहे. राज्यात भाजपाला कोणी वालीच नसल्याने त्याचे नेते मंडळी सुद्धा भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांच्या इशाऱ्यावरच मान डुलवत आहेत. मुख्यमंत्री नसताना सरकार चालू शकते हा पायंडा गोव्यात पडलेला आहे. हा चुकीचा संदेश आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरएसएससमोर गोवा फॉरवर्डचे लोटांगण
प्रदीप पाडगावकर म्हणाले, महाराष्ट्र गोमतंक पक्ष (मगोप) याने भूमिका घेतली आहे की ते भाजपमध्ये पक्ष विलीन करणार नाही. मात्र दुसरीकडे गोवा फॉरवर्ड पक्ष सत्तेसाठी आपले ‘गोंयकारपण’ हे बिद्रवाक्यच विसरला आहे. ज्या तत्त्वांवर गोवा फॉरवर्डने विधानसभा निवडणूक लढवली होती त्याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. एका रात्रीत गोवा फॉरवर्डने भाजपला पाठिंबा देत सत्तेसाठी लोकांच्या कौलाला तिलांजली दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर (आरएसएस) गोवा फॉरवर्डने सपशेल लोटांगण घातले आहे. सत्तेत बढती मिळावी, यासाठी हा सगळा खटाटोप चालला आहे. नद्यांचे राष्ट्रीयीकरण, कोळसा यासारख्या विषयांना गोवा फॉरवर्डने बगल दिली.
काँग्रेसची केवळ हुलकावणी
एल्विस गोम्स म्हणाले, काँग्रेस पक्ष केवळ सरकार स्थापनेची हुलकावणी देत आहे. त्यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्याचा आकडा नाही. मात्र लोकांचा दाखवण्यासाठी राजकीय खेळीचा अवलंब स्वीकाराला आहे. जर काँग्रेसला सरकार स्थापित करण्याचे होते तर त्यांनी ऑगस्टमध्ये झालेल्या अधिवेशनावेळी का पुढाकार घेतला नाही? फॉर्मेलिनयुक्त मासळीचा प्रश्न ऐरणीवर असताना काँग्रेसने अधिवेशनचा केवळ वेळ दवडला होता. याची आठवण गोम्स यांनी करून दिली. काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना भेटून एक दिवसाचे खास अधिवेशन बोलवून राज्यातील विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करायला लावा, अशी मागणी केली होती. तसेच काँग्रेस पक्ष बहुमत सिद्ध करायला तयार आहे, असा दावाही केला होता.