मडगाव - गोव्यात अनुसूचित जाती व जमातींवर होणा-या अन्यायांची संख्या जास्त असली तरी त्यापैकी मोजक्याच तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतात हे लक्षात आल्यानंतर अशा तक्रारी नोंद करण्यासाठी आदिवासी कल्याण खात्यातर्फे लवकरच एक अॅप तयार करण्याचा निर्णय सरकार पातळीवर घेण्यात आला असून यासंबंधी पुढील कार्यवाही करण्यासाठी गुरुवारी आदिवासी कल्याण खात्यात बैठक घेण्यात येणार आहे.अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मागच्या वर्षभरात आयोगाकडे अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत जवळपास 80 तक्रारी नोंद झाल्या आहेत. मात्र पोलिसात केवळ चार तक्रारी नोंद झाल्या आहेत. कदाचित लोक पोलिसांर्पयत जाण्यास भीत असावेत असे वाटल्यामुळेच अशा तक्रारी हाताळण्यासाठी अॅप तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा अॅप कसा असावा हे ठरविण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी आदिवासी कल्याण खात्यात बैठक होणार आहे. या बैठकीत आदिवासी कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जाती जमाती आयोग, पोलीस अधिकारी आणि आयटी तज्ञ यांची बैठक होणार आहे. गोव्यातील सर्व खाती या अॅपखाली जोडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, मंगळवारी मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या कायद्याखाली स्थापलेल्या जिल्हा दक्षता समितीची बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्न आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या बैठकीत अशाप्रकारच्या केसीस हाताळण्यासाठी दोन्ही जिल्हय़ात खास पोलीस कक्ष उभारण्याची शिफारस करण्यात आली असून हा कक्ष उपअधीक्षक स्तरावरील अधिका:यांकडून हाताळला जावा अशी शिफारस करण्यात आली आहे. या बैठकीला आयोगाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, जिल्हा कायदा सेवा समितीच्या सचिव शुभदा दळवी, पोलीस उपअधीक्षक किरण पोडुवाल तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
अनुसूचित जाती जमातीच्या तक्रारीसाठी गोव्यात लवकरच अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 10:16 PM