नारायण गावस, पणजी: राज्यातील काजू हंगाम संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे काजू बियावर आधारभूत किंमतीसाठी अर्ज करणे सुरु केले आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे विभागीय कृषी कार्यालयात हे अर्ज स्वीकारले जात आहेत. यंदा काजू उत्पादन ५० टक्क्यांनी घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता या आधारभूत किंमतीच्या लाभासाठी अर्ज केले आहेत.
यंदा काजू उत्पादनही कमी त्यात दरही ११२ ते ११५ प्रती किलोपर्यंत मिळाला यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. गेल्या वर्षी काजू दर प्रती किलो १२५ होता यंदा त्याहूनही कमी मिळाला. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना १५० रुपये प्रतिकिलो अशी आधारभूत किंमत मिळाली होती. म्हणजे वरील प्रतिकिलाे २५ रुपये कृषी खात्याने शेतकऱ्यांना दिले होते. यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्याने १८० ते २०० रुपये आधारभूत किंमत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहेत.
आता मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला आहे. काजू हंगाम संपला आहे त्यामुळे अनेक शेतकरी सध्या काजू बियावर आधारभूत किंमतीची वाट पाहत होते. शेतकऱ्यांनी नोंदणीकृत कारखानदाराकडून काजू बील घेऊन हे अर्ज सादर करावे असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. कृषी खात्याकडे हे अर्ज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना किमान ४०० किलोपर्यंत काजूवर आधारभूत मिळू शकते. गेल्यावर्षीही एवढ्याच किलोवर आधारभूत देण्यात आली होती.
सत्तरीचे शेतकरी रामचंद्र गावकर म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्केही काजूचे उत्पादन झाले नाही. गेल्या वर्षी दरही जास्त होता. यंदा दरही कमी आणि त्यात उत्पादनही घटले आहे. त्यामुळे कृषी खात्याने किमान २०० रुपये आधारभूत किंमत देणे गरजेचे आहे. अन्यथा आता काजू शेतीकरणे परवडणार नाही. सरकारने यंदा शेतकऱ्यांची दखल घेऊन आधारभूत किंमतीत वाढ करावी.
कृषी संचालक नेविल अफोन्सो आधारभूत किंमतीसाठी राज्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज घेणे कृषी खात्याने सुरु केले आहे. यंदा गेल्या वर्षीसारखी १५० रुपये आधारभूत आहे. शेतकऱ्यांकडून १८० ते २०० रुपये मागणी केली जात आहे. पण सध्या आचारसंहिता आहे आचारसंहिता संपल्यावर सरकारकडून याच्यावर योग्य तो प्रस्ताव येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विभागीय कृषी कार्यालयात आधारभूत किंमतीसाठी अर्ज करावे. सर्व कार्यलयात हे अर्ज उपलब्ध आहे. यासाठी कृषी कार्ड अनिवार्य आहे.