मडगाव : पणजी पोलिस ठाणा हल्ला प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची मुभा द्यावी, यासाठी महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात व त्यांच्या पत्नी, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आता पुढच्या सुनावणीच्या वेळी युक्तीवाद होवून निवाडा दिला जाईल अशी शक्यता आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी, दि. १२ जानेवारीला होणार आहे. आज शुक्रवारी येथील खास न्यायालयाचे न्यायाधीश इर्शाद आगा यांच्या न्यायालयात हा खटला सुनावणीस आला. यावेळी मंत्री बाबुश, त्यांच्या पत्नी जेनिफर व अन्य संशयित हजर होते.
बाबुश यांना ३१ डिसेंबरपर्यंत या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहण्याची मुभा न्यायालयाने दिली होती. ती मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा ते काल न्यायालयात हजर झाले. २००८ साली पणजी पोलिस ठाण्यावर हल्ला झाला होता. तत्कालीन मंत्री बाबूश यांच्या समर्थकांना अटक केली होती. त्यांना सोडविण्यासाठी ते गेले होते.