गोव्यात पूर्णवेळ राज्यपाल नेमा; घटक राज्यदिनी कॉंग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 03:38 PM2021-05-30T15:38:57+5:302021-05-30T15:39:15+5:30
आज घटनात्मक अधिकार असलेले राज्यपाल पूर्णवेळ गोव्यात उपलब्ध नसल्याने, राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे.
पणजी : गोवा राज्य ३५ वा घटक राज्यदिन साजरा करीत असतानाच गोव्याला पूर्णवेळ राज्यपाल नाही याकडे प्रदेश कॉंग्रेसने लक्ष वेधले असून गोमंतकीयांचे हित जपणाऱ्या पूर्णवेळ राज्यपालांची नेमणूक करावी व गोमंतकीयांना न्याय द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून केली आहे.
पत्रात असे म्हटले आहे की, भाजप सरकारच्या बेजबाबदार व असंवेदनशील कारभारामुळे गोमंतकीय गुदमरत आहेत. गोमंतकीयांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी मागील नऊ महिने गोव्याला पूर्णवेळ राज्यपाल नाहीत. गोव्यातील एकंदर परिस्थितीची त्यांना कल्पना राष्ट्रपतींना देण्यात आली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे कोविड महामारीत गोवेकर संकटात आहेत. त्यातच तौक्ते चक्रीवादळाने संकटात भर टाकली आहे. राज्यात कोविडने आज पर्यंत २५९७ लोकांना मृत्यू झाले. गोव्यात भाजप सरकारने लोकांचा घटनात्मक जगण्याचा अधिकार हिरावून घेतल्याने गोवा राज्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाल्याचे नमूद करून गोमेकॉत प्राणवायुच्या कमतरतेमुळे सुमारे ७५ बळी गेल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
तौक्ते चक्रीवादळात सुमारे १४६ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. गोव्याला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर पंतप्रधानांनी गोव्याची हवाई पाहणी करण्याचे टाळले तसेच गोव्यासाठी कसलीच मदत जाहीर केली नाही याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. गोव्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळल्याचे नमूद करुन, बंद असलेला खाण व्यवसाय, ठप्प झालेला पर्यटन व्यवसाय व आता कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लावलेला कर्फ्यू यामुळे लोक हवालदील झाल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यमान आमदार व मुख्यमंत्र्यांना निवेदने सादर करुनही सरकारकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही हे राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
आज घटनात्मक अधिकार असलेले राज्यपाल पूर्णवेळ गोव्यात उपलब्ध नसल्याने, राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री तसेच इतर मंत्रीगण एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्री परस्पर विरोधी विधाने करीत असल्याने लोकांमध्ये अविश्वास बळावला आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. विद्यमान भाजप सरकार बरखास्त करावे अशी मागणी करणारे निवेदन राज्यपालांनाही दिल्याचेही राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची स्तुती सदर पत्रात करण्यात आली असून, त्यांनी गोमंतकीयांचे हित जपण्यासाठी वेळोवेळी पावले उचलली होती हे राष्ट्रपतींच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. म्हादई प्रश्न, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा यावर माजी राज्यपालांनी घेतलेल्या भुमिकेचे कॉंग्रेस पक्षाने कौतुक करुन त्यांचे आभार मानले आहेत.
गोव्यात आज सरकारी कारभार पूर्णपणे कोलमडला असून सगळीकडे सावळा गोंधळ चालू आहे. अशा कठिण काळात गोव्यात पूर्णवेळ राज्यपाल नेमणे गरजेचे असल्याचे पक्षाने म्हटले आहे. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला असल्याने पूर्णवेळ राज्यपाल नेमणे हा गोवेकरांचा अधिकार असल्याचे कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रपतींच्या नजरेसमोर मांडले आहे.