पणजी : ड्युटीवर असताना अपघाती मरण पावलेल्या सरकारी कर्मचाºयांच्या नातलगांना अनुकंपा तत्त्वावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नियुक्तीपत्रे प्रदान केली. आणखी १२ जणांना सरकारी सेवेत घेण्यात आले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, ड्युटीवर असताना अपघाती मरण पावलेल्या कर्मचाºयांच्या नातलगांचे नोकरीसाठीचे अर्ज प्रलंबित ठेवले जाणार नाहीत. त्यांची तात्काळ भरती केली जाईल. बोरी येथे वीज खात्याचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात तीन कर्मचाºयांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या नातलगांना तीन महिन्यात नोकरी दिली जावी यासाठी आमचे प्रयत्न होते परंतु काही अडचणी आल्या त्या दूर करुन आता त्यांना नियुक्तीपत्रे दिलेली आहेत.
कामवार असताना हृदविकाराच्या झटक्याने किंवा अन्य प्रकारे कर्मचाºयांचे आकस्मिक निधन झाल्यास परिस्थितीनुसार निर्णय घेऊन नियुक्त्या केल्या जातील. मुख्यमंत्री म्हणाले की, चतुर्थी सणानिमित्त घरोघरी आनंदाचे वातावरण असावे यासाठी सरकारने गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, लहान व्यावसायिकांना पॅकेज अशा सर्व कल्याणकारी योजनांव्दारे १२३ कोटी रुपये घरोघर पोचवले आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे हित जपणारे आहे.
दरम्यान, कार्मिक खात्याच्या संयुक्त सचिव मेघना शेटगांवकर यांनी अधिक माहिती देताना असे सांगितले की, ‘ २0१९ पासून आतापर्यत वेगवेगळ्या खात्यांमध्ये अनुकंपा तत्त्वारवर २४६ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली आहेत. अद्याप ४९९ अर्ज प्रलंबित आहेत.