लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : प्रदेश भाजपने तडकाफडकी सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती मागे घेतली असून येत्या एक-दोन दिवसांत नवे प्रवक्ते जाहीर केले जातील. प्रवक्ते सावियो रॉड्रिग्स हे अलीकडच्या काळात पक्षासाठी फार मोठी डोकेदुखी ठरले होते. स्वतः सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता असूनही सरकारमधील मंत्र्यांविरोधात बोलणे, पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत भूमिका घेणे आदी प्रकार त्यांनी चालवले होते. कला अकादमी संकुलाच्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी आमदारांनी केल्यानंतर त्यांनी कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
स्वत:च्याच पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा त्यांनी मागितल्यावर प्रदेशाध्यक्षांनी त्यांना चांगलेच सुनावले होते. असे असतानाही पक्षाच्या ध्येय धोरणांच्या नेमकी विरोधात भूमिका घेणे, स्वत:च्याच सरकारविरोधात बोलणे त्यांनी चालूच ठेवले. गेल्या आठवड्यात पक्षाला विश्वासात न घेताच ते राज्यपालांना भेटले व सरकारने केवळ मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आणलेली योजना चर्चनाही लागू करावी, अशी मागणी मंत्र्यांकडे ही मागणी ते करू शकले असते. परंतु पक्षनेत्यांना विश्वासात घेता ते आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते. दोन दिवसांपूर्वी फातोर्डा कार्निव्हलच्या प्रश्नावर त्यांनी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. त्यांचे हे वागणे पक्षाच्या शिस्तीत बसणारे नसल्याने त्यांना प्रवक्तेपदावरून हटविण्याच्या हेतूनेच सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्तीचा आदेश मागे घेण्यात आला आहे. सावियो रॉड्रिग्स यांच्यासह गिरीराज पै वेर्णेकर, ॲड. यतीश नायक, प्रेमानंद म्हांबरे, ऊर्फान मुल्ला, सिद्धार्थ कुंकळ्येंकर असे एकूण सहा प्रदेश प्रवक्ते होते.
एक ते दोन दिवसांत नवे प्रवक्ते
प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी यास दुजोरा दिला. ते म्हणाले की, गेल्या ७ रोजी मी सहाही प्रवक्त्यांना फोन करून तसे सांगितले आहे. पुढील एक ते दोन दिवसांत नवे प्रवक्ते नियुक्त केले जातील. दरम्यान, पक्षाकडून बूथ पुनर्रचनेचे काम जोरात चालू आहे. शक्ती केंद्रांवर ४७० विस्तारक नेमले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम चालू आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"