पणजी : शिक्षणाच्या माध्यम धोरणाचा मसुदा तयार करताना चर्च संस्थेला विश्वासात घेतले गेले नाही. देशातील चर्चशी निगडित संस्थांवर हल्ले होतात व गुन्हेगार मोकाट सुटतात. चर्चच्या सेवाकार्याकडे संशयाने पाहिले जाते. धर्मांतराचा आरोप आमच्यावर केला जातो, अशा शब्दांत गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी खंत व्यक्त करतानाच सत्ताधाऱ्यांचे कान पिळले. भ्रष्टाचारामुळे प्रशासन कमकुवत झाल्याचेही ते म्हणाले. आल्तिनो येथील आर्चबिशप पॅलेससमोर फेर्रांव यांनी नाताळ सणानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी फेर्रांव यांचे भाषण झाले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे, मगोपचे नेते सुदिन ढवळीकर, आमदार रोहन खंवटे आदी या वेळी उपस्थित होते. आर्चबिशप म्हणाले की, चर्र्चकडून शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले जाते. देशाच्या संरक्षणासाठी आणि प्रशासनासाठीही अल्पसंख्याकांमधून अनेक चांगले अधिकारी देशाला मिळाले. तरीदेखील चर्च संस्थेच्या विदेशी मुळाबाबत काहीजणांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. देशातील वातावरण पूर्वीसारखे राहिलेले नाही. गोव्याने मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी पाहिली आहे. सामाजिक हानीही अनुभवास येत आहे. खनिज खाणींच्या नावाखाली समाजातील ठराविक घटकांनीच नैसर्गिक संपत्ती ओरबाडून नेली. आमची पिढी बेजबाबदार होती, जिने नैसर्गिक संपत्ती लुटली, असाच प्रश्न आम्ही नव्या पिढीसमोर ठेवणार आहोत काय, अशी विचारणा आर्चबिशप फेर्रांव यांनी केली. पर्यावरणाच्या आणि सामाजिक हानीच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार निर्माण झाला व प्रशासन कमकुवत झाले, असे आर्चबिशप म्हणाले. चर्च संस्था माणुसकीची मूल्ये जपण्याचे कार्य करते. मानवतेची सेवा करते. चर्चच्या कायद्याखाली तसेच राज्याच्या कायद्याखाली आमच्या संस्था काम करतात. या संस्था चांगल्या प्रकारे चालण्यासाठी सरकारी अधिकारिणी आणि संस्थांमध्ये सातत्याने संपर्क असायला हवा. मात्र, खेद वाटतो की, काहीवेळा असा संपर्क आणि संवाद दिसून येत नाही, असे आर्चबिशप म्हणाले. (खास प्रतिनिधी)
आर्चबिशपनी पिळले सत्ताधाऱ्यांचे कान..!
By admin | Published: December 29, 2016 2:00 AM