सुशांत कुंकळयेकर
मडगाव - पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन गळा चिरुन गत्या करणारा चंदिगडचा ट्रॅव्हल एजंट व डिजे सुखविंदर सिंग याला अटक करण्यात आली आहे. गोव्यात आले असता आपली पत्नी अलका सहानी हिचा खून करुन तो पंजाबात पळून गेला होता. मात्र त्याच्या फोनचे ट्रेकिंग करत गोवा पोलीस लुधियानापर्यंत पोहचले आणि लुधियानातील एका हॉटेलमध्ये आसरा घेतलेल्या सुखविंदरला अटक करण्यात आली आहे.
हणजुणा पोलीस स्टेशनचे निरिक्षक नवलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, फेब्रुवारी महिन्यात सुखविंदरचे अलकाशी लग्न झाले होते. मात्र दोघेही पती-पत्नी एकामेकांच्या चारित्र्याचा संशय घेत होते. त्यामुळे त्यांच्यात सतत वादही होत असत. 20 एप्रिल रोजी ते दोघेही गोव्यात आले होते. उत्तर गोव्यातील आरपोरा या किनारपट्टी भागात एका हॉटेलमध्ये ते दोघेही उतरले होते. त्याच रात्री नशेत असताना पुन्हा एकदा त्यांचं भांडण सुरू झाले. याच भांडणातून स्वत: वरील ताबा गेलेल्या सुखविंदरने आपल्या पत्नीची गळा चिरुन हत्या केली आणि पहाटेच्या वेळी गोव्यातील दाबोळी विमानतळ गाठून विमानाने तो दिल्लीला फरार झाला.
दिल्लीतून तो टॅक्सीने चंदिगडमध्ये गेला. मात्र आपल्या पाठोपाठ पोलीसही चंदिगडमध्ये पोहचतील या भीतीने सुरुवातीला तो मनालीत जाऊन राहिला त्यानंतर लुधियानात येऊन एका हॉटेलचा आसरा त्याने घेतला. दरम्यान त्याने आपल्या मोबाईलचे सीम कार्डही बदलले. पण मोबाईलच्या ईएमईआय नंबरवरुन पोलिसांना त्याचा ठावाठिकाणा समजला आणि 2 मे रोजी पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले. सध्या या संशयिताचा ताबा हणजुणा पोलिसांनी घेतला असून म्हापसा न्यायालयाने त्याला दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा रिमांड पोलिसांना दिला आहे.