लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव : गोव्यातील नाट्य चळवळ व सामाजिक कार्याचे भिष्माचार्य अशी ओळख असलेले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण केशव नायक वय (९६) यांचे रविवारी वृध्दापकाळामुळे निधन झाले. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर मडगावच्या मठग्राम हिंदूसभेच्या स्मशानभूमीत साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
नायक हे दि गोवा हिंदू असोशिएशन, मडगावच्या गोमंत विद्या निकेतन, गोवा मराठी विज्ञान परिषद, समाजसेवा संघ, स्नेह मंदिर अशा विविध संस्थांशी ते निगडित होते. वयोमानामुळे सक्रीय समाजकार्यातून निवृत्त घेतलेल्या नायक यांनी अलिकडेच फोंड्यातील बांदोडा येथील स्नेह मंदिरात आश्रय घेतला होता. त्यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी खालावली होती. वारखंडे-फोंडा येथील सावईकर इस्पितळात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्यांचे प्राणज्योत मालवली.राकृष्ण नायक यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला होता. राज्यातील समाजकार्यचे अध्वर्यु म्हणून ओळखले जाणारे केशव नायक यांचे ते सुपुत्र होते. त्यांनी आपल्या वडिलांकडून समाजसेवेचा वसा घेतला होता. सर्व आयुष्य समाजसेवेला वाहून घेतले रामकृष्ण हे अविवाहित होते. ज्या - ज्या संस्थांशी त्यांचा संबध आला, त्या संस्थांच्या कार्यकर्त्यांना ते कुटूंबीय मानत. ते व्यवसायाने चार्टड अकाउंटंट होते.
मुंबईतील द गोवा हिंदू असोसिएशन या प्रमुख सांस्कृतिक संघटनेशी संबंधित होते. या संस्थेची स्थापना मुंबईतील गोमंतकवासियांनी १९१९ मध्ये केली होती. नायक ६० च्या दशकात संस्थेत सामील झाले आणि त्यांनी या विभागाची कलाविभाग स्थापना केली, ज्याने मराठीतील आघाडीच्या कलाकारांना एकत्र आणले. वि. वा. शिरवाडकर, वसंत कानिटकर, जितेंद्र अभिषेकी, आशालता वाबगावकर आणि अन्य.या आघाडीच्या कलाकारांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात या संस्थेव्दारे नाट्यप्रयोग सादर केले होते. १९८० मध्ये, नायक यांनी त्यांचे मित्र आणि हितचिंतकांसह बांदोडा कोमुनिदाद आणि चौगुले, साळगावकर, धेंपे, ठक्कर आणि इतर गोव्यातील आघाडीच्या उद्योगपतींच्या मदतीने बांदोडा येथे प्रसिद्ध वृद्धाश्रम स्नेह मंदिरची स्थापना केली होती.
नायक यांनी मुंबईत त्या काळातील आघाडीच्या व्यावसायिक घराण्यांसोबत काम केले. तरीही त्यांनी आपला वेळ ६० आणि ७० च्या दशकात मुंबईत स्थायिक झालेल्या गोमंतकातील लोकांसाठी, सामाजिक कार्यांसाठी समर्पित केला.