पणजी : जन्मजात अपंगत्वावर मात करून किरण शेरखाने ह्या 27 वर्षीय कलाकाराने अत्यंत आकर्षक अशी चित्रे साकारली आहेत. त्याच्या देखण्या चित्रकृतींचे प्रदर्शन व विक्री कला अकादमीच्या कला दालनात दस-याच्या मुहूर्तावर सुरू झाली आहे. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले गेले.मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे चेअरमन संजय हरमलकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत, चित्रकार हर्षदा केरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेरखाने हे मुळचे हुबळीमधील आहेत. तिथे त्यांनी फाईन आर्टमध्ये पदवी प्राप्त केली. ते आता पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांचे राहुल हे 25 वर्षीय भाऊ त्यांच्यासोबत असतात. विविध गावांमध्ये किंवा अन्यत्र भाऊ त्यांना घेऊन जातात व तिथे प्रत्यक्ष वास्तू किंवा माणसे पाहून शेरखाने आपल्या चित्रंमध्ये त्यांना टीपतात व सुंदर चित्रकृती साकारते.कला अकादमीतील त्यांची चित्रे पाहून मंत्री गावडे यांनी बरेच कौतुगोद्गार काढले. पूर्ण समाजाने अशा कलाकाराच्या मागे राहायला हवे, आपण तर पूर्णपणे पाठिंबा देईन, असे गावडे म्हणाले. शेरखाने यांची कलासाधना त्यांच्या प्रत्येक चित्रकृतीमागे दिसून येते. त्यांचे काम ग्रेट आहे, असे हरमलकर म्हणाले. केवढ्याही मोठ्या अपंगत्वावर मात करून आपले ध्येय गाठता येते हे शेरखाने यांनी दाखवून दिले. त्यांची कला ही मोठी प्रेरणादायी आहे. आर्थिक व सामाजिक मागासलेपणावर मात करून ते पुढे आले. हे खरे सीमोल्लंघन आहे, असे कामत म्हणाले. 21 पर्यंत प्रदर्शन व विक्री सुरू राहील. दरम्यान, लोकविश्वास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कला चैतन्य ह्या विशेष मुलांच्या पेंटिंग प्रदर्शनाचे उद्घाटन आज 19 रोजी होणार आहे. त्यावेळी शेरखाने हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित असतील.
अपंगत्वावर मात करून कलाकारांचे सीमोल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 9:22 PM