पणजी : आरटीओ मुख्यालयातील शिपाई दामू गावडे याला एक लाख रुपये लाच घेताना एसीबी अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्यानंतर संशयाच्या घेऱ्यात आलेले वाहतूक संचालक अरुण देसाई यांची मंगळवारी उचलबांगडी करण्यात आली. या प्रकरणात साहाय्यक संचालक विश्राम गोवेकर यांचीही कसून चौक शी सुरू आहे. गोवेकर यांच्या घराचीही झडती घेण्यात आली आहे. देसाई यांची बदली उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ या पदी करण्यात आली असून त्या जागी असलेले सुनील मसुरकर यांना वाहतूक संचालकपदी आणण्यात आले आहे. कार्मिक खात्याने मंगळवारी सायंकाळी हा आदेश काढला. मोटर वाहन साहाय्यक निरीक्षक अॅलिस्टर फर्नांडिस यांचे सायबर गुन्ह्यासंबंधीचे प्रकरण मिटविण्यासाठी वरिष्ठांना देण्यासाठी म्हणून दामू गावडे याने १ लाख रुपये लाच घेतली होती. अॅलिस्टर यांचा प्रोबेशन काळ असल्याने नोकरी जाईल, या भीतीने तेही घाबरले. हे प्रकरण मिटविण्यासाठी वरिष्ठांना ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे दामू याने त्यांना सांगितले. पैसे देण्याची तयारी दाखवून अॅलिस्टर यांनी १ लाखाचा पहिला हप्ता घेऊन आरटीओ मुख्यालयात येतो असे सांगितले व त्याची कल्पना एसीबी अधिकाऱ्यांना देऊन सापळा लावण्यात आला. २८ आॅगस्ट रोजी दामू याला पकडण्यात आले होते. नंतर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्याने दिलेल्या जबाबात काही नावे पुढे आली. त्यानुसार साहाय्यक संचालक गोवेकर यांच्यावर कारवाई सुरू झाली. अरुण देसाई यांनाही मध्यंतरी एसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. देसाई हे गेल्या आठ वर्षांपेक्षा जास्त काळ वाहतूक संचालकपदी होते. (प्रतिनिधी)
अरुण देसाई यांची उचलबांगडी
By admin | Published: September 16, 2015 2:32 AM