काशिराम म्हांबरे, म्हापसा: दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी २०१७ साली निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यासंबंधीच्या याचिकेवरील सुनावणी म्हापसातील प्रथम वर्ग न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.
या याचिकेसंबंधी २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी केजरीवाल यांना आज ५ जानेवारीच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. लोकप्रतिनिधी कायदा आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १७१(अ) अंतर्गत न्यायालयाकडून हेआदेश देण्यात आलेले. निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान येथील टॅक्सी स्थानकावर केजरीवाल यांच्या झालेल्या जाहीर सभेवेळी त्यांनी आपल्या भाषणातून मतदारांना प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून मतांच्या बदल्यात पैसे स्विकारणे आवाहन केले होते, मात्र मत फक्त त्यांच्याच पक्षाला देण्याची विनंती केली होती.
त्यानंतर तत्कालीन निर्वाचन अधिकाºयाने त्यांच्या विरोधात म्हापसा पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. दिलेल्या आदेशानंतर पोलिसांकडून केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज झालेल्या सुनावणीवेळी दरम्यान केजरीवाल यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सुट देण्याची मागणी त्यांच्या वकिलाने न्यायालयाकडे केली होती. केलेली मागणी न्यायालयाने मान्य करून सुनावणी १२ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली.