ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २१ : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे येत्या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात गोवा भेटीवर येणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री बनल्यानंतरची केजरीवाल यांची ही तिसरी गोवा भेट असेल. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू आपला सापडले त्याच धर्तीवर गोव्यात एखादा प्रभावी चेहरा सापडतो का याचा शोध आम आदमी पक्ष घेत आहे.
केजरीवाल हे वारंवार गोव्यास भेट देऊन नव्या चेह:यांचा शोध घेत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीवेळी लोकांसमोर आपचा प्रभावी नेता म्हणून सादर करण्यासाठी एखादा नवा चेहरा सापडतो का हे केजरीवाल यांच्यासह पंकज गुप्ता व आशूतोष तसेच दिनेश वाघेला हे आपचे राष्ट्रीय नेतेही पाहत आहेत. आपचा प्रभाव राज्यातील स्तीबहुल मतदारसंघांमध्ये वाढत आहेत. काँग्रेस व भाजपच्याही ताब्यातील काही मतदारसंघांना आम आदमी पक्षाने लक्ष्य बनविले आहे.
निवडणूक कुठच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली लढवावी याचे उत्तर आपला अजून सापडलेले नाही. डॉ. ऑस्कर रिबेलो यांच्यासाठी आम आदमी पक्षाने खूप प्रयत्न करून पाहिले. निवडणूक प्रचारावेळी रिबेलो, ज्येष्ठ पर्यावरणवादी क्लॉड अल्वारीस हे आपसाठी सक्रिय होतील पण रिबेलो यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आपच्या नेत्यांना अन्य चेह:यांचा शोध घ्यावा लागत आहे. काँग्रेस किंवा भाजपमधून निमंत्रण देऊन बोलवावा असा सिद्धूसारखा विश्वासार्ह असा कुणी नेता गोव्यात अजून आम आदमी पक्षाला सापडलेला नाही.
केजरीवाल यांनी यापूर्वी दोनवेळा गोव्यास भेट दिली. त्यांच्या जाहीर सभेस प्रचंड प्रतिसाद लाभला होता. विविध समाज घटकांशी बोलून जनमत अजमविण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी दुस:यांदा गोव्यास दिलेल्या भेटीवेळी केला. गोवा संवाद उपक्रमही केजरीवाल यांच्या उपस्थितीत सुरू झाला आहे. युवा, महिला व अन्य घटकांशी आपचे नेते आता संवाद साधण्याचे कार्यक्रम अनेक ठिकाणी करत आहेत. या संवादातून आम आदमी पक्षाचा निवडणूक जाहीरनामा ठरणार आहे.दरम्यान, आपच्या गोवा शाखेच्या मिडिया विभागाचे प्रमुख रुपेश शिंक्रे यांनी सांगितले की, येत्या महिन्यात युवकांशी संवाद साधण्याचा केजरीवाल यांचा आणखी एक कार्यक्रम गोव्यात आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल. यापूर्वी फोंडय़ात युवकांशी संवादाचा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला.