लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरीः व्याघ्र प्रकल्पाशी निगडीत अधिसूचना सरकारने जारी केली व त्या अधिसूचनेनुसार पूर्ण म्हादई अभयारण्य हे व्याघ्र राखीव क्षेत्रात रुपांतरित झाले तर एका सत्तरी तालुक्यातून सोळा हजार कुटुंबांना अन्यत्र हलवावे लागेल. त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे लागेल, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.
म्हादईच्या क्षेत्रात सध्या सोळा हजार कुटुंबे आहेत. एक वाघ तीनशे किलोमीटर क्षेत्रात फिरतो असे अपेक्षित धरले जाते. गोव्याहून खोतीगावपर्यंत एक कोरिडोअर अपेक्षित धरले तर ८ विधानसभा मतदारसंघांचा संबंध येईल. एका म्हादई अभयारण्यातच व्याघ्र प्रकल्प केला तर १६ हजार कुटुंबे म्हणजेच ७० हजार लोकांना अन्यत्र हलवावे लागेल. व्याघ्र क्षेत्रात राहू शकत नाहीत, असे एक अभ्यासक आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर म्हणाले.
लोक अडचणीत येतील: दिव्या राणे
म्हादई अभयारण्य परिसर हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाले, तर त्या परिसरात राहणाऱ्या १५ हजार लोकांना त्याचा फटका बसेल, अशी चिंता पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी व्यक्त केली.
म्हादई वाचवण्यासाठी म्हादई अभयारण्य परिसर हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर होणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते म्हणत आहेत. मात्र, म्हादई वाचवण्यासाठी हाच एकमेव उपाय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राणे म्हणाल्या की, म्हादई अभयारण्य परिसर हा खोतीगावपर्यंत व्यापलेला आहे. या परिसरात हजारो संख्येने लोक राहात असून, त्यांची संख्या १५ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे जर म्हादई अभयारण्य परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाले तर त्याचा फटका या १५ हजार लोकांना बसण्याची भीती आहे. अशातच त्या लोकांचे पुनर्वसन करणे हे आव्हान आहे. एकवेळ त्यांचे पुनर्वसन केले जाईलही, मात्र त्यांच्या उपजीविकेच्या साधनाचे काय करणार? हा मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
म्हादई अभयारण्य परिसर हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. उच्च न्यायालयाने त्यावर निवाडाही दिला. त्यामुळे आता मुख्यमंत्री तसेच वनमंत्री यावर निर्णय घेतील. लोकांना फटका बसू नये यासाठी म्हादई अभयारण्य परिसर हा व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर होऊ नये, असे वाटते असेही त्या म्हणाल्या.
सत्तरीतील जंगल हे सह्याद्री पर्वतरांगांमधील महत्वपूर्ण घटक आहे. गोवा सीमेवर असलेल्या डोंगराळ जंगलामुळेच समुद्राच्या दिशेने येणारे मोसमी वारे अडवले जाते व पाऊस पडतो. हे जंगल संपले तर दुष्काळ निर्माण होणार आहे म्हणून विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश होत असेल तर त्याला विकास नावाचा विनाश म्हणावा लागेल. शेवटी माणूस पैसे खाऊ शकणार नाही. आज पैसे असलेले लोक शुद्ध हवा, पाणी व अन्नधान्य मिळण्याची अपेक्षा करतात. आमचे हे नैसर्गिक धन सरकारने हिसकाऊन आम्हाला अपंग करू नये. - देवेंद्र तवडकर, आमोणे-पैंगीण.