अप्पा बुवा / फोंडा लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा गावणे -बांदोडा परिसरात खारे पाणी शेतात घुसल्याने शेतीसह माड, पोफळी, फणस, मिरी व अन्य झाडे करपून गेली आहेत. सदर नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे २०-२५ शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे ६-७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्या ६-७ महिन्यापासून खारे पाणी शेतात घुसण्याचा प्रकार घडत असून अजून पर्यंत तरी सरकारतर्फे तोडगा काढण्याचा प्रयत्न झालेला नाही. अशी कैफियत शेतकऱ्यांनी मांडली आहे.बांदोडा व मडकई येथील सीमारेषेवर असलेल्या मानसीचे दरवाजे बंद केल्यास खारे पाणी घुसण्याचा प्रकार त्वरित बंद होवू शकतो. त्यासाठी सरकारने पावसाळ्यापूर्वी मानसीचे दरवाजे बंद करून दिलासा देण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. गावणे येथील शेतात गेल्या सहा महिन्यापूर्वी मानसीचे दरवाजे खुले केल्याने खारे पाणी घुसून बागायती तसेच शेती नष्ट झाली आहे. परिसरातील सुमारे ३५० पेक्षा अधिक माड व पोफळीची झाडे करपून मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी सध्या सरकारच्या सहकार्याची अपेक्षा बाळगत आहे.एका महिन्यापूर्वी स्थानिक सरपंचांना माहिती दिल्यानंतर पाहणी करून विविध खात्याला निवेदने पाठविण्यात आली होती. परंतु अजून पर्यंत सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नसल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहे. खाऱ्या पाण्याचा फटका वेलिंग परिसरातील शेतकऱ्यांना सुद्धा बसला असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासंबधी अधिक माहिती देताना शशिकांत गावडे म्हणाले कि गेल्या ६ -७ महिन्यापासून खारे पाणी पूर्णपणे शेतात घुसून परिसरातील माड, पोफळीची झाडे व अन्य झाडे पूर्णपणे करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. पावसाळ्यापूर्वी मानसीचे दरवाजे बंद न केल्यास संपूर्ण शेती कायमची सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार येऊ शकते. सरकारने यासंबधी गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. म्हाद्दू नाईक म्हणतात 'खाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात इथला शेती व्यवसाय इतिहास जमा होईल.पूर्वजांनी लागवड केलेली बागायती गेल्या ६ महिन्यात खाऱ्या पाण्यामुळे नष्ट होण्याचा मार्गावर आहे. बागायती दररोज काळजी घेण्यात येत होती. परंतु खाऱ्या पाण्यामुळे माड व पोफळीची झाडे करपत असल्याचे पाहून दुःख वाटत आहे. सरकारने यासंदर्भात लक्ष देवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असल्याचे जुजे सिल्वेरा यांनी सांगितले. बांदोडा पंचायतीचे सरपंच सर्वानंद कूर्पासकर यांनी खारे पाणी शेतात घुसल्यांची माहिती मिळाल्यावर स्थानिक पंच व्यंकटेश नाईक सह स्वतः जाऊन पाहणी केली होती. ते म्हणतात की यासंबधी विविध खात्याना निवेदने देवून आवश्यक तोडगा काढण्याची मागणी पंचायततर्फे करण्यात आली होती. त्यानुसार येत्या आठवड्यात संयुक्तपणे पाहणी करण्यात येणार आहे.
खारे पाणी शेतात घुसल्याने शेतीसह झाडे करपली
By आप्पा बुवा | Published: May 14, 2023 6:01 PM