- तुळशीदास गांजेकर, संकलक, सनातन संस्था
अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर! वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी आहे- आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी। संत नामदेव आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर ! पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर. या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे; म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा बाळगून असतो.
अमरकोषात 'वार' हा शब्द 'समुदाय' या अर्थाने वापरला आहे. यावरून 'भक्तांचा समुदाय' असा 'वारी' शब्दाचा अर्थ. संस्कृत भाषेत 'वारि' म्हणजे पाणी. पाण्याचा प्रवाह जसा अनेक वळणे घेऊन समुद्राला मिळतो, तसा वारकऱ्यांच्या भक्तीच्या प्रेमाने भारलेला प्रवाह पंढरपूरला येऊन मिळतो.
विठुरायाच्या नामगजरात निघणाऱ्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन, मन आणि धन सर्व काही देवाचरणी अर्पण होत असते. भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो, त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूलदेहही चंदनाप्रमाणे झिजतो. त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात.
भगवान श्रीविष्णूचे कलियुगातील सगुण रूपातील अस्तित्व म्हणजे पंढरीनाथाची दगडी काळी मूर्ती होय. ती साधी मूर्ती नाही, तर श्रीविष्णूचा सगुण देह आहे. पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात. कोणाचेही निमंत्रण नसताना लक्षावधी भाविक येथे येतात आणि अत्यानंदाने न्हाऊन निघतात. थकून भागून जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो, तेव्हा काही काळासाठी त्या जिवाची उन्मनी अवस्था झालेली असते. पंढरीच्या वारीचे हेच आध्यात्मिक रहस्य आहे.
संत ज्ञानेश्वरांनी वारी या व्रताचा प्रारंभ केला. तेव्हापासून चालू असलेल्या वारीमुळे पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती जागृतावस्थेत आली आहे. राम कृष्ण हरी। असे नामसंकीर्तन करत वारकरी पंढरीस जातात. कलियुगात ईश्वराची कृपा संपादन करणाऱ्या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादनाचा प्रयत्न करतात, तेव्हा ती समष्टी साधना होते. वारीत व्यष्टीसह समष्टी साधनाही होते आणि सर्व जिवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते. या तीर्थाचा महिमाच असा आहे. येथील भक्तांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेच लागते. पंढरपूरच्या वारीने आपल्या जीवनात भक्तीचा अखंड झरा पाझरू लागतो. भावभक्तीचे बीज प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजवणारी ही वारी पृथ्वीच्या अंतापर्यंत अशीच सुरू राहणार आहे.
देव भावाचा भुकेला आहे, याची प्रचिती पंढरपूरला येते! भक्तांच्या संकटसमयी धावून येण्यासाठी, आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल पंढरपुरात उभा आहे. वारीत घडणारे शिस्तीचे दर्शन हे पालख्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रत्येक दिंडीची रचना ठरलेली आहे. प्रारंभी भगवे ध्वजधारी वारकरी, मग तुळशी-वृंदावन घेतलेल्या महिला, त्यामागे टाळकरी, नंतर विणेकरी अशीच सर्व दिंड्यांची रचना असते. टाळ वाजवणाऱ्या वारकऱ्यांचा पदन्यासही लयबद्ध असतो. भले टाळकरी-वारकरी शेकडोंच्या संख्येने का असेनात!
वैयक्तिक जीवनातील अभिनिवेष बाजूला ठेवून ईश्वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी! श्रीक्षेत्र आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव ! ऊन-पावसाची तमा न बाळगता भगवी पताका खांद्यावर घेऊन टाळ-मृदंगाचा गजर करत चालणारे वारकरी म्हणजे भावभक्तीचेच प्रतीक! कोणाच्याही चेहऱ्यावर चिंता नाही की मुक्कामाच्या ठिकाणी सोयी-सुविधांची अपेक्षा नाही. वारकऱ्यांना प्रतिदिन १० ते २० किलोमीटरचा टप्पा चालत पार करावा लागतो. सकाळी लवकर मार्गस्थ व्हावे लागते. अल्पोपाहार आणि महाप्रसादही वाटेतच घ्यावा लागतो. सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर भजन-कीर्तन होऊन दिवसाची समाप्ती होते.
घेऊन आषाढाच्या सरी वारकरी आले दारी गजू लागले अवघे हे विठ्ठलापूर एक नाद, एक स्वर, एक गजर, एक उर वाचे-मुखे विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
शाळकरी, वारकरी सारे झाले गोळा, विठ्ठलापुरात विठ्ठल-रखुमाई मंदिरात सोळा साक्ष वाळवंटीची देत वर उभा आहे विठ्ठल विटेवर भक्ता, भिऊ नकोस मी तुझा पाठीराखा
- ज्योती व्यंकटेश सिनारी आमोणा, डिचोली.