पणजी: ताळगाव येथील कामराभाट येथे गुरुवारपासून रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून व मशीनला पुष्पहार घालून या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी तळगावचे सरपंच जानू रोझारीयो, इतर पंच सदस्य, स्थानिक, व कंत्राटदार उपस्थिती होते.
कामराभाट येथे रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, याची मागणी खूप महिन्यांपासून सुरू होती, त्या अनुषंगाने हे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाला पूर्ण व्हायला ३-४ दिवस लागू शकणार. त्यांनतर इतर भागातील रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल, तसेच डागडुजीनंतर या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या त्या काही दिवसात ताळगाव मधील सर्व रस्ते चांगले होणार आहे, असे आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी यावेळी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून तळगावमध्ये सांडपाणी भूमिगत वाहिनीचे काम सुरू होते, यातून अनेक रस्ते खचले होते, तसेच अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली होती. यामध्ये प्रामुख्याने कामराभाट, दोनापावला, नागाळी, व ओयतियान या भागांचा समावेश होता. कामराभाट येथे रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे, हे काम पूर्ण झाल्यानंतर दोनापावला, नागाळी, व ओयतियान या भागातील देखील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य होऊ शकले आहे, असेही मोन्सेरात यांनी यावेळी सांगितले.