लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आसगाव घर मोडल्याच्या प्रकरणात पोलीस मुख्यालयातून मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणी हणजूणचे पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्यासह उपनिरीक्षक संकेत पोखरे व नितीन नाईक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. मुख्य सचिवांच्या चौकशी अहवालानंतर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात तीन बाऊन्सरनाही अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे आसगावमधील गुंडगिरी प्रकरणाची दखल घेतली जात आहे. या प्रकरणातील पहिल्या कारवाईत तीन पोलीस अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याचा आदेश पोलीस मुख्यालयातून जारी करण्यात आला आहे. मुख्य सचिवांकडून चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांनी या प्रकरणात केलेल्या प्राथमिक तपासात पोलीस अधिकाऱ्याची निष्क्रियता आढळून आली आहे. काही पोलीस अधिकारी सीसीटीव्ही कॅमऱ्यातही टीपले गेले आहेत. हा अहवाल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सादर करण्यात आल्यानंतर लगेच काही तासातच ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दुसरीकडे या प्रकरणात गुन्हे शाखेने काल अशफाक कादिर शेख, महमद इम्रान शलमानी (३४) आणि अझीम कादर शेख (३४) या तिघा बाऊन्सरना अटक केली आहे. तसेच अब्दुल कादिर शेख या ४० वर्षांच्या मंगूरहिल-वास्को येथील इसमाला अटक केली आहे. अशफाक हा घटनास्थळी हजर असल्याचे सीसीटीव्ही फूटेजमधून उघड झाले.
तक्रार मागे घेतल्याने विषय पंक्चर
दरम्यान, पुजा शर्मा हिच्याविरुद्धची तक्रार आगरवाडेकर कुटूंबाने मागे घेतली आहे. मग पुजा शर्माला अटक करण्यासाठी पोलिस का धडपडतात असा प्रश्न काहीजण विचारत आहेत. या प्रकरणी अगोदरच पोलिस व इतरांनी हयगय केली. त्यामुळे हा विषय वाढला व भलतीकडेच पोहचला. आगरवाडेकर कुटूंबाने तक्रार मागे घेतल्याने हा एकूण विषय पंक्चर झाला असे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
कार जप्त
गुन्ह्यासाठी मुख्य संशयित अशफाक शेख याला कार देण्यात आली होती. हेच वाहन गुन्ह्याच्या ठिकाणाहून टिपलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये कैद झाले आहे. कार जप्त करण्यात आली आहे. तसेच महम्मद इम्रान शलमानी आणि अझीम कादर शेख हे घर पाडण्याच्या कामात सक्रीय होते, असेही तपासातून आढळूले. हे दोघे कार घेऊन आले होते, अशी माहिती क्राईम बॅचचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
पूजा शर्मा आई आहे, तिला अटक केलेले बघवणार नाही!
आगरवाडेकर यांचे घर मोडल्या याप्रकरणी दाखल केलेली तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा शर्माची दिशाभूल करून हा व्यवहार झाल्याचे सांगत तक्रार मागे घेत असल्याचे प्रिन्शा आगरवाडेकर यांनी सांगितले आहे. या कुटुंबाला अचानक पूजा शर्माचा आलेला कळवळा पाहून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.