पणजी : राज्यातील फॉर्मेलिन मासेप्रश्नी दुस-या दिवशीही विरोधी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत हल्लाबोल केला. यामुळे निर्माण झालेल्या गोंधळात सभापती डॉ. प्रमोद सावंत हे विधानसभेचे कामकाज पुढे नेऊ शकले नाहीत. मासेप्रश्नी चर्चा करूया असा आग्रह विरोधी आमदार धरत होते, पण सरकारने माशांची आयात बंद करण्याची कृती केल्याने तातडीने फॉर्मेलिन मासेप्रश्नी चर्चा करण्याची गरज राहिली नाही असे सरकारचे म्हणणो आहे.
कामकाज सकाळी प्रथम तहकूब झाल्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पत्रकारांकडे आपले मत व्यक्त केले. परप्रांतांमधून येणा-या माशांवर आम्ही बंदी लागू केली आहे. शिवाय सीमेवरून काही ट्रक परतही पाठवले आहेत. हे मासे दूषित होते, असे मी म्हणत नाही. पण सरकार कारवाई करत आहे. विरोधी काँग्रेस पक्ष मात्र प्रसिद्धीसाठी विधानसभेचे कामकाज बंद करत आहे. विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस गुरुवारी दिली होती, तो विषय गुरुवारीच संपला. सरकारने कृती केल्याने आता फॉर्मेलिन मासेप्रश्नी तातडीने चर्चा करण्याची गरज नाही. मी सोमवारी विधानसभेत लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर देईन. एफडीए व मच्छीमार अशा दोन खात्यांशी हा विषय निगडीत असून दोन्ही खात्यांकडून माहिती आल्यानंतर सोमवारी मला उत्तर देता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शुक्रवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. यावेळी प्रथम विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर उभे राहिले. फॉर्मेलिन माशांच्या विषयावर पूर्ण गोवा खूप चिंतेत आहे. प्रत्येकाला स्वत:च्या आरोग्याची काळजी आहे. अशावेळी सरकारने फॉर्मेलिन मासेप्रश्नी आता तरी चर्चा सुरू करावी, आमचा स्थगन प्रस्ताव आता विचारात घ्यावा, असे कवळेकर म्हणाले. स्थगन प्रस्तावाचा विषय काल गुरुवारी होता, तो कालच संपला. तुम्ही शुक्रवारी पुन्हा स्थगन प्रस्तावाची नोटीस दिलेली नाही, येत्या सोमवारी मुख्यमंत्री फॉर्मेलिन मासेप्रश्नी उत्तर देतील, असे सभापतींनी विरोधी आमदारांना सांगितले. मात्र सभापतींचे म्हणणो काँग्रेस आमदारांना मान्य झाले नाही. जेव्हा मंत्री, आमदार आजारी असतात तेव्हा गोमंतकीय जनता त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असते, गा:हाणो घालत असते, आता लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून आम्ही विधानसभेत माशांप्रश्नी तातडीने चर्चा करायला नको काय अशी विचारणा कवळेकर यांनी केली. स्थगन प्रस्ताव आता चर्चेसाठी घ्या, असे कवळेकर म्हणाले. स्थगन प्रस्ताव आता नाहीच असे मुख्यमंत्री र्पीकर यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे सगळे आमदार उभे राहिले व त्यांनी मासेप्रश्नी चर्चेचा आग्रह धरला. तुम्ही विधानसभेचा वेळ वाया घालवत आहात, असे सभापती विरोधकांना म्हणाले. मुख्यमंत्री आजारी होते तेव्हा आम्ही 22 दिवसांचे अधिवेशन चार दिवसांवर आणण्यासाठी सरकारला सहकार्य केले होते, असा उल्लेख कवळेकर यांनी केला. त्यास मुख्यमंत्र्यांसह काही मंत्र्यांनीही आक्षेप घेतला. यावेळी सभागृहात गोंधळ वाढला. आम्हाला प्रश्नोत्तराचा तास झालेला हवा आहे, अशी मागणी भाजपचे आमदार राजेश पाटणोकर व निलेश काब्राल करू लागले. विरोधी काँग्रेस आमदार चर्चेचा आग्रह धरत सभापतींच्या आसनासमोर धावले. यावेळी सभापतींनी दुपारी अडीच वाजेर्पयत कामकाज तहकुब केले जात असल्याचे जाहीर केले.
दुपारी अडीचनंतर कामकाजाला पुन्हा आरंभ झाला, त्यावेळीही आमदारांनी फॉर्मेलिन मासेप्रश्नी चर्चा व्हावी, अशी मागणी सुरू केली. यावेळीही गोंधळ झाल्यानंतर सोमवार्पयत सभापतींनी कामकाज तहकूब केले आहे.