पणजी : महाराष्ट्रात आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एक तरी मंत्रिपद रिपब्लिकन पक्षाला मिळायला हवे, अशी मागणी पक्षाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
गोवा भेटीवर आलेले आठवले यानी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला स्थान दिले जाईल, असे आश्वासन यापूर्वी दिलेले आहे, असे ते म्हणाले. पाचही राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीची सत्ता येईल तसेच लोकसभा निवडणुकीतही एनडीएला ३३० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा ठाम विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
आठवले म्हणाले कि,‘ विरोधकांना ‘इंडिया’ नाव घेण्याचा अधिकार नाही. इंडिया आमचा देश आहे. ‘इंडिया’च्या नावाने निवडणूक लढवू नये.आठवले म्हणाले की, केंद्रात मोदी सरकारने गेल्या सव्वा नऊ वर्षांच्या काळात अत्यंत चांगली कामगिरी बजावली आहे. सर्वसामान्य लोकांना बॅंक खाते म्हणजे काय हे ठाऊक नव्हते. ५० कोटी ५५ लाख ७४ हजार लोकांची बॅंक खाती उघडली. गोव्यात २ लाख १ हजार खाती उघडण्यात आली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत ३२.५ कोटींपेक्षा अधिक कर्ज देशभारत गरजूंना मिळाले. ९ कोटी ५८ लाख लोकांना देशभरात गॅस सिलिंडर दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतून गोव्यात ३००० लोकांना घरे दिली.’
आठवले यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’चे समर्थन केले. ते म्हणाले की, वेगवेगळ्या निवडणुका घेतल्याने हजारो कोटी रुपये खर्च होतात. मोदींजींना वाटते एकाचवेळी निवडणुका व्हाव्यात परंतु ते कितपत शक्य आहे सांगता येत नाही. संसदेत कायदा करावा लागेल.’ महिला आरक्षण कायदा हे मोदीजींचे क्रांतिकारक पाऊल आहे. पत्रकार परिषदेस आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, विजय कदम, सतीश बोरगांवकर आदी उपस्थित होते.