पणजी : आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्याच्या उमेदवाराला ७५ टक्के मतदान होईल, असा विश्वास गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष तथा कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित नमो युवा चौपाल, ‘४०० पे चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. जुने गोवा येथे कुंभारजुवे मतदारसंघातील तरुण मतदारांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अर्पिता बडाजेना, माजी मंत्री दिलीप परुळेकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, भाजयुमो राज्य अध्यक्ष समीर मांद्रेकर, भाजप कुंभारजुवे मंडळ प्रभारी चंदन वरगावकर,भाजप कुंभारजुवे मंडळाचे सरचिटणीस शिवा नाईक, भाजयुमो कुंभारजुवेचे अध्यक्ष हर्षिकेश कुंडईकर, भाजयुमो कुंभारजुवेचे सरचिटणीस अघन भंडारे उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांनी अटल सेतूची कल्पना केली होती, त्याचा अनेकांना कसा फायदा झाला हे आज आपण पाहत आहोत. हे मोदी सरकारचे यश आहे. आज देश पाण्याखाली, जमिनीवर आणि अंतराळातही इतिहास घडवत आहे, असे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले.
विकसित राज्य असल्यामुळे जागतिक कार्यक्रमांचे आयोजनांसाठी गोव्याला पसंती दिली जाते, गोवा दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत चालले आहे. येथील युवकही खूप सक्रिय आहे, असे अर्पिता बडाजेना म्हणाल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही अशीच कार्यशैली होती. भाजप सरकारच्या काळात अशा नेत्यांच्या दूरदर्शी विचारसरणीमुळे गोव्याचा झपाट्याने विकास झाला आहे, असे मांद्रेकर यांनी यावेळी सांगितले.
‘मेक इन इंडिया’ उपक्रम सुरू झाला तेव्हा अनेकांनी याची खिल्ली उडवली होती. आता त्याऐवजी आम्ही देशांना निर्यात करत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही ‘स्टार्टअप इंडिया’ सुरू केले आहे. सरकार आमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. सावंत सरकार आणि मोदी सरकारच्या रूपाने आमच्याकडे डबल इंजिन सरकार आहे. असे परुळेकर यांनी यावेळी सांगितले.