पणजी - मांडवी नदीवरील तिस-या पुलाला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय भुपृष्ट व अवजढ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलाचे उद्घाटन करतानाच पुलाचे नाव ‘अटलसेतु’ असे जाहीर केले. आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मांडवीवर उभारण्यात आलेल्या तिस-या पुलाला कुणाचे नाव द्यावे यावरूनही मोठा वादंग मातला होता. पुलाच्या नावावरून राजकारणही सुरू झाले होते. पुलाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाउसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून तर तत्कालीन विरोधीपक्षनेते व ओपिनियन पोलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले जॅक सिक्वेरा यांचे नाव देण्याचीही मागणी कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षाकडून केली जात होती. परंतु दोन्ही पर्याय फेटाळून लावून वाजपेयी यांचेच नाव देण्यात आले.
गोव्यातील मांडवी नदीवरील दोन्ही पुलांच्या मधोमद उंच अंतरावर उभारण्यात अलेला हा साडेपाच किलोमीटर अंतराचा पूल पणजी शहरातील वाहतू समस्या मोठ्या प्रमाणावर हलकी करणार आहे. या पुलाचे अत्यंत विक्रमी कालावधीत बांधकाम करण्यात आल्यामुळे तो वापरासाठीही लवकरच खुला करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु पंतप्रधान व्यस्त असल्यामुले गडकरी यांच्या हस्ते सायंकाळी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. २९ जानेवारी रोजी हा पूल वापरासाठी खुला करून दिला जाणार आहे.