लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : अटल सेतू वाहतुकीसाठी अंशत: खुला करण्याच्या सूचना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल दिल्या आहेत. २ एप्रिलपासून एक लेन तर १० एप्रिलपासून दोन्ही लेन खुल्या करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
अटल सेतू हा वारंवार दुरुस्ती कामासाठी बंद ठेवला जात असल्यामुळे होणाऱ्या वाहतूक समस्येविषयी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. अटल सेतूच्या कामाची पाहणी करून आल्यानंतर त्यांनी सांगितले की २ एप्रिलपासून एक पुलाची फोंडा ते म्हापसा लेन वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. तसेच १० एप्रिलपासून दोन्हीही लेन सुरळीतपणे सुरू होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
१ एप्रिलपासून दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे, याची आपल्याला माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाईल. वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, यासाठी एक लेन खुली करण्यात येणार आहे.
दुचाकींनाही प्रवेश
अटल सेतूवर दुचाकीवाल्यांना अंशत: प्रवेश दिला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. फोंड्याहून पणजीला येणाऱ्या दुचाकीस्वारांना अटल सेतूचा वापर करता येणार आहे. परंतु फोंड्याहून थेट पर्वरी किंवा पणजीहून म्हापसा किंवा म्हापसाहून मडगाव किंवा फोंड्याला जाणाया दुचाकीस्वारांना प्रवेश दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांवर पलटवार
अटलसेतूच्या मुद्यावरून विरोधकांच्या आरोपांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांचा अटल सेतूलाही विरोध होता. आज एक दिवस अटल सेतू बंद राहिला तर वाहतुकीची किती मोठी समस्या निर्माण होते हे आपण पाहतच आहोत, असेही ते म्हणाले.
वॉटरप्रूफिंग सदोष
अटल सेतुवरील वॉटरप्रूफिंग तंत्रज्ञान फेल ठरल्याची कबुली मुख्यत्र्यांनी दिली आहे. आता दर्जाच्या बाबतीत जगातील दोन क्रमांकचे मशीन जर्मनीहून आणून कंत्राटदार कंपनीकडून स्वखचनि पुन्हा हे काम सुरु केले आहे. अटल सेतूच्या वॉटरप्रूफिंगसाठी मेंब्रेन घालून त्यावर बिदुमीन घालण्यात आले होते. परंतु हे तंत्रज्ञान फोल ठरले. आता नवीन तंत्रज्ञानाद्वारे काम सुरु केले आहे. यात कंत्राटदाराची चूक नसल्याचेही ते म्हणाले. एल.एण्ड टी. ही कंत्राटदार कंपनी हे काम करीत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. वॉटरप्रूफिंग झाल्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे.
पणजीतील कामे पावसाळ्यापूर्वी होणार
पणजी स्मार्ट सिटीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. मलनिस्सारणाची कामे थांबविली आहेत. केवळ स्मार्ट सिटीची कामे चालू आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या पावसाळ्यात पणजी बुडणार नाही, असेही ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"