पणजी : गोवा राज्य दिपोत्सवाच्या उत्साहात आहे. पण गोव्यातील सत्ताधारी भाजप पक्षासाठी मात्र स्फोटक वातावरण आहे. पक्षातील माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री व अनेक प्रमुख कार्यकर्ते उघडपणे पक्षाच्या विविध निर्णयांविरुद्ध बंड करण्याचे इशारे देत आहेत. एरव्ही शिस्त आणि पार्टी विथ डिफरन्सच्या गोष्टी सांगणारे भाजप नेते सध्या पक्षातील विविध आजी-माजी आमदार व मंत्र्यांच्या बंडाच्या भाषेवर नियंत्रण ठेवू शकलेले नाहीत.
गोव्यात यावेळी शिरोडा व मांद्रे या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. भाजपच्या तिकीटावर दोनवेळा निवडून आलेले व उद्योगमंत्रीही बनलेले माजी मंत्री महादेव नाईक यांनी यावेळी बंडाचा इशारा जाहीरपणे दिला आहे. भाजपकडून पोटनिवडणुकीवेळी सुभाष शिरोडकर यांना तिकीट दिले जाईल. आम्ही शिरोडकर यांच्या पराभवासाठी काम करू, असे नाईक यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच एरव्ही भाजपचे सदस्य असलेल्या काही पंच सदस्यांनी दिला आहे. दुसऱ्याबाजूने भाजपचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी थेट मुख्यमंत्री पर्रीकर, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आदींवर शरसंधान केलेले आहे. पक्षाची गाभा समिती ही निरुपयोगी आहे अशीही टीका पार्सेकर यांनी केली.
पार्सेकर हे दोनवेळा गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष होते. दरवेळी जेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होतात तेव्हा गोव्यात भाजप सत्तेवर येतो असे अभिमानाने यापूर्वी भाजपकडून सांगितले जात होते. पार्सेकर हे अनेकदा मांद्रे मतदारसंघातून निवडून आले. गेल्यावेळीच त्यांना पराभव झाला. तथापि, यावेळी मांद्रे मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार दयानंद सोपटे यांना पराभूत करण्याचा विडा पार्सेकर यांनी उचलला आहे.
भाजपच्या कोअर टीमचे काही सदस्य सध्या पक्षातील स्फोटक वातावरण शांत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्यांना यश येत नाही. भाजपचे विद्यमान ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो या दोघांनीही भाजपला विविध प्रकारे सध्या आव्हान दिले आहे. सध्याच्या राजकीय स्थितीवर गोमंतकीय नाराज आहेत, असे सांगत लोबो यांनी भाजपला व पर्रीकर सरकारला चिमटा काढला आहे. तर डिसोझा यांनी भाजपच्या गाभा समितीवर काम करण्याची आपल्याला इच्छाच राहिलेली नाही, असे स्पष्ट केले आहे.