बार्देस : कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खोब्रावाडा येथील दोन आणि उमतावाडा-कळंगुट येथील एक अशा तीन डान्सबारची सुमारे ४०० लोकांच्या जमावाने मोडतोड केली. संतप्त जमावाने हे डान्सबार कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी या वेळी केली. कळंगुटमध्ये परप्रांतीय व्यावसायिकांकडून बार व रेस्टॉरंटच्या नावाखाली डान्सबार चालविले जात असल्याचा दावा करत आमदार मायकल लोबो यांच्या घरी जमलेल्या स्थानिकांनी त्यांना धारेवर धरले. तुम्ही कळंगुटमध्ये डान्सबार कसे चालविण्यास देता? यावर सरकारचे काहीच नियंत्रण कसे नाही? असे प्रश्न करत जमावाने लोबो यांना आपल्यासोबत डान्सबारकडे येण्यास भाग पाडले. त्यानंतर संतापलेल्या जमावाने डान्सबारची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. हे तीनही डान्सबार गोव्याबाहेरील व्यावसायिकांचे आहेत. ते पाडत असताना त्यांचे मालक लोबो यांच्याकडे आले आणि त्यांनी, ‘हे फक्त रेस्टॉरंट आहे, डान्सबार नाही,’ असे सांगितले. त्यावर काहींनी आत जाऊन पाहिले असता, ते डान्सबार असल्याचे उघडकीस आले. या वेळी मायकल लोबो यांनी, हे डान्सबार कळंगुटमध्ये चालविण्यास देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत खडसावले. तसेच येथील युवक अशा डान्सबारमध्ये जाऊन वाईट मार्गाला लागले, असे सांगितले. दरम्यान, यासंबंधी कळंगुट पोलीस स्थानकाशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस उपनिरीक्षक पेडणेकर यांनी या प्रकरणी तपास चालू असल्याचे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली. (प्रतिनिधी)
कळंगुटमध्ये डान्सबारवर हल्लाबोल
By admin | Published: February 22, 2015 1:20 AM