लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : राज्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना मारहाण करण्याच्या घटना समोर येत आहेत. सरकारने या घटनांची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा दिला असतानाही आज मोरजी येथे एका रशियन महिलेला हॉटेलच्या दोन कामगारांकडून मारहाण करण्यात आली आहे.
याप्रकरणी काल पेडणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी हॉटेलमधील अविनाश गोरिया ( वय २९, रा. बदलापूर) व मोहम्मद फैजल खान (वय २६, रा. झारखंड) या दोघांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरजी येथील ग्रैंड इन हॉटेलमध्ये इगूल इलव्हेटीनोव्हा ही तीस वर्षीय रशियन महिला वास्तव्यास होती. २४ रोजी तीन वाजता ती राहत असलेल्या खोलीच्या खिडकीतून दोन कामगारांनी प्रवेश करून तिचे नाक व तोंड दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे काही पर्यटक धावून आले. त्यानंतर ते दोघेही पळून गेले. तक्रारदाराने पेडणे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर पेडणे पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२५ आणि ३४ आयपीसीअंतर्गत पुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.
तपास पेडणे पोलिस उपनिरीक्षक सुमेधा नाईक, पोलिस उपअधीक्षक राजेश कुमार व पेडणे पोलिस निरीक्षक दत्तराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"