मडगाव: गोव्यातील दक्षिण गोव्यातील कुंकळळी येथे मदधुंद अवस्थेत पोलिसांवर हल्ला प्रकरणी फरार पाच संशयितांना अटक केल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली. मंगळवारी पहाटे देमानी - कुंकळळी येथे घडलेल्या या हल्ल्याच्या घटनेत चार पोलीस जखमी झाले होते. मयूर देसाई व शेख अब्दुल रझाक या दोघांची मंगळवारी पोलिसांनी मुसक्या आवळेल्या होत्या तर संदीप देसाई , संतोष नाईक , शुभम बोरकर उर्फ चिकू, साईश देसाई व स्वप्नेश देसाई हे फरार होते. आज बुधवारी ते सर्वजण पोलिसांना शरण आले.
सर्व संशयितांवर भारतीय दंड संहितेंच्या कलम १४३ , १४७ , १४८ , १४९. ३२३ , ३२४ , ३५२ , ५0६ (२) तसेच सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. कुंकळळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टेरन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान मंगळवारी अटक केलेल्या मयूर देसाई व शेख अब्दुल रझाक या दोघांना मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयापुढे उभे केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
मंगळवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान कुंकळळी येथील साई सुपर स्टोअरजवळ संशयितांनी पोलिसांवर हल्ला चढविला होता. दारुच्या नशेत तर्र असलेल्या या संशयितांनी घटनास्थळी आलेल्या पोलिसांना दांडयानी मारहाण करुन नंतर जीपचीही हानी केली होती. काही युवक रस्त्यावर दारु पिउन मस्ती करीत असल्याची तक्रार पोलीस कंट्रोल रुमला आली होती. कारवाईसाठी पोलीस गेले असता, त्यांच्यावर संशयितांनी हल्ला चढविला होता. या हल्ल्यात संजय गावकर, आकाश गावकर, प्रमोद कोठारकर व महेश नाईक हे पोलीस जखमी झाले होते. यातील एकाचे दातही पाडले तर इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली होती. जखमींना सरकारी इस्पितळात उपचार करुन मागाहून घरी पाठवून दिले होते.