लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक किनारी भागाकडे आकर्षित होतात. पर्यटन स्थळांकडे येऊन आनंद लुटत असतात. परंतु काही ठिकाणी देशी, परदेशी पर्यटकांवर सध्या हल्ले होऊन त्यांना जखमी करणे, त्यांची लूटमार करणे, मारहाण, किमती वस्तूंच्या चोऱ्या, विनयभंग, बलात्कार असे प्रकार वाढीस लागत आहेत. या प्रकारांमुळे पर्यटन क्षेत्र बदनाम होत असून, व्यवसाय धोक्यात येत आहे.
या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने आणि स्थानिक पंचायतीने पुढाकार घेऊन कायद्यानुसार नियम आणि अटींची अंमलबजावणी करण्यासाठी वेळीच प्रयत्न करायला हवेत. अन्यथा पर्यटन व्यवसाय संपुष्टात येण्यास विलंब लागणार नाही, अशी भीती व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.
याविषयी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांनंतर त्यावर नियंत्रण ठेवले जाते. पुन्हा काही दिवसांनी त्या धंद्याला उत येतो. या व्यवसायात गुंतलेल्या महिला थेट किनारी भागात रेस्ट हाऊस, गेस्ट हाऊसमध्ये किंवा भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या खोल्यांमध्ये गुपचूप व्यवसाय करीत असतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.
पोलिसांनी दक्ष राहावे
पोलिसांनी ज्या किनारी भागात जे रेस्ट हाऊस, गेस्ट हाऊस चालवतात आणि त्या ठिकाणी कोणत्या महिला कोणत्या युवतीच्या नावावर ते भाडे भरत आहे, त्या कसल्या प्रकारचा व्यवसाय करतात, त्या कुठे जातात, त्याचा तपशील पोलिसांनी आणि स्थानिक पंचायतीने गोळा करणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या बेभान वागण्याबद्दल सुभाष महाले व व्यंकटेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
महिलांचा संशयकल्लोळ
मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात अमली पदार्थ, वेश्या व्यवसाय आणि प्रदूषणामुळे गोव्याचे नाव बदनाम केले जात आहे. यावर जर वेळीच नियंत्रण मिळाले नाही, तर भविष्यात पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील. त्यामुळे स्थानिक आणि बिगर गोमंतकीय व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. हरमल किनारी भागात मोठ्या प्रमाणात खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"