म्हापसा : उघड्यावर घाण करणारे, बाटल्या फोडणारे तसेच सार्वजनिक उपद्रव करणारे दर्जा नसलेल्या पर्यटकांवर लक्ष केंद्रीत केल्यास हळूहळू विष प्रयोग करुन हा व्यवसाय मारला जाण्याची भीती उपसभापती मायकल लोबो यांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या पर्यटकांमुळे गोव्यातील पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्यापेक्षा राज्यात चांगले दर्जेदार पर्यटक आणण्याचे प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन उपसभापती मायकल लोबो यांनी केले आहे. तसेच या व्यवसायावर लागू करण्यात आलेली २८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली.
मागील तीन वर्षांपासून सततपणे या मुद्यावर आपण प्रकर्षाने बोलत आहे; पण त्यावर सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने शोकांतिका म्हणावी लागत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत सुद्धा यावर चर्चा केली होती; पण त्यावर दुर्लक्ष केले जात असल्याने पर्यटन व्यवसायावर परिणाम होणार असल्याची भीती लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यंदा नाताळ तसेच नवीन वर्षात आलेल्या पर्यटकांची संख्या किमान ५० टक्क्यांनी कमी झाली. त्यात भर म्हणून आलेले पर्यटक दर्जा नसलेले असल्याने त्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कसल्याच प्रकारचा लाभ इथल्या व्यवसायाला झाला नाही. उलट त्यांनी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केला. अर्धा कपड्यातून त किनारी भागात फिरले. जेवण बनवण्यासाठी उघड्यावर सिलिंडराचा वापर करुन मर्यादेचे उल्लंघन केला. त्यातून व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे लोबो म्हणाले.
सरकारने पर्यटन व्यवसायावर २८ टक्के जीएसटी लागू केली आहे. त्याचे परिणाम सुद्धा या व्यवसायावर झाले असून हा कर कमी करुन व्यवसायाला दिलासा देण्याची मागणी लोबो यांनी केली. वाढत जाणा-या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पर्यटन व्यवसायाशी निगडीत असलेल्यांची संयुक्त बैठक घेणे गरजेचे असून बैठकीला किनारी भागातील पंचायतींना सहभागी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच उपद्रव करणा-यांवर कारवाई करण्यासाठी पर्यटन व्यवसाय कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज मायकल लोबो यांनी व्यक्त केली.