राजेश निस्ताने -पणजी : गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे; परंतु सर्वाधिक लक्षवेधी लढत ही राजधानी पणजीतील ठरणार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा पणजी हा परंपरागत मतदार संघ; परंतु येथे त्यांचा मुलगा उत्पल यालाच भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या बाबूश मॉन्सेरात यांना आपला उमेदवार बनविले आहे.
‘मनी आणि मसल पॉवर’ हा बाबूश यांचा प्लस पॉइंट ठरला आहे. दुसऱ्या मतदारसंघातून लढण्याची पक्षाने दिलेली ऑफर उत्पल यांनी धुडकावून पणजी या आपल्या वडिलांच्या मतदारसंघातच अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात शड्डू ठोकला आहे. मनोहर पर्रीकरांच्या मुलालाच भाजपने तिकीट नाकारले, एवढ्याच एका कारणावरून पणजीतील निवडणूक देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा दिला. भाजपचे बाबूश मॉन्सेरात, ‘आप’चे वाल्मीक नाईक, काँग्रेसचे एलवीस गोनेस, आरजीपीचे राजेश रेडेकर हेसुद्धा प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. गोवा भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सांकली मतदारसंघातील लढतही महत्त्वाची मानली जाते. याशिवाय चर्चिल आलेमाव, रवी नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर हे तीन माजी मुख्यमंत्रीसुद्धा रिंगणात आहेत. हे तिघेही तीन वेगवेगळ्या पक्षांकडून लढत आहेत.
प्रचारासाठी महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांची ‘आयात’ - गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान तोंडावर आले असले, तरी कार्यकर्ते सक्रिय झालेले नाहीत. येथे प्रचाराला कार्यकर्ते कमी पडत असल्याने महाराष्ट्रातून कार्यकर्ते आयात करण्याची वेळ नेत्यांवर आली आहे.- महाराष्ट्रातून प्रमुख पक्षांचे अनेक नेते प्रचारासाठी गोव्यात आले आहेत. त्यांच्याकडे विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी पक्षाने दिली आहे. मात्र, येथे बुथवर बसायलाही पक्षाचा कार्यकर्ता उपलब्ध नाही. त्यामुळे या नेत्यांपुढे पेच पडला आहे. कोकण, कोल्हापूर, सोलापूर या नजीकच्या भागातून आलेल्या अनेक नेत्यांनी आपल्या मतदारसंघातून शंभरावर कार्यकर्ते प्रचारासाठी गोव्यात बोलविले आहे.
कार्यालयात शुकशुकाटगोव्यात काँग्रेसचे तर फारसे नियोजन दिसत नाही. बाहेरून येणाऱ्या नेत्यांना निवडणुकीबाबत स्थानिक अपडेट माहितीही दिली जात नसल्याची ओरड आहे. बाहेरून येणाऱ्या स्टार प्रचारकांच्या भेटीगाठी, स्वागतासाठी प्रदेश सरचिटणीस किंवा अन्य पदाधिकारी उपस्थित राहत नसल्याची खंत काही नेत्यांनी बोलून दाखविली.