किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : स्मार्ट सिटीची कामे अर्धवट राहिल्याने पावसाळ्यात काय वाढून ठेवले आहे, याची कल्पनाच न केलेली बरी, अशी चिंतायुक्त भीती व्यक्त करीत उत्पल पर्रीकर यांनी महापालिकेत व मतदारसंघात सत्ताबदल झाल्याशिवाय राजधानी शहराला चांगले दिवस येणे कठीण असल्याचे भाष्य केले आहे.
'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले की, लोकांना एवढा त्रास होत असूनही महापालिकेतील एकही सत्ताधारी नगरसेवक यावर बोलत नाही. महापालिकेत गेली २० वर्षांपासून फॅमिलीराज चालले आहे. आता तर आमदाराने खुद्द पुत्राला महापौरपदाच्या खुर्चीवर बसवलेय. महापालिकेत सत्ताबदल व्हायला हवा. तसेच आमदारालाही लोकांनी घरी पाठवायला हवे. पणजीवासीयांना मी पर्याय दिला होता, याचीही आठवण पर्रीकर यांनी करून दिली.
एका प्रश्नावर उत्पल म्हणाले की, स्मार्ट सिटीसाठी निधी केंद्र सरकारकडून मिळलेला आहे. कालांतराने मी केंद्राकडे या एकूण प्रकल्पाच्या खर्चाचे ऑडिट जनतेसाठी जाहीर करावे, अशी मागणी करणार आहे.
उत्पल म्हणाले की, आयएएस अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांना स्मार्ट सिटीच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने खास आणलेले आहे. त्यांना काही अवधी द्यावा लागेल. संजित यांनी महापालिका आयुक्त म्हणून पूर्वी काम केले आहे. त्यांना शहराची खडानखडा माहिती असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. शेवटी काही ना काही तोडगा यायला हवा आणि शहरवासीयांना दिलासा मिळायला हवा.
उत्पल म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वी या प्रश्नावर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. पावसाळ्यात शहरवासीयांच्या तसेच राजधानीला भेट देणाऱ्या वाहनधारकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागेल, हे मी त्यांना सांगितले आहे.
धोका दूर नाही.....
स्मार्ट सिटीचे ज्या प्रकारचे काम झालेले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. १५ ट्रक रुतले ही गंभीर बाब आहे. कालांतरानेही शहरात अशा दुर्घटना घडू शकतात. येत्या पावसाळ्यात पणजी बुडणार की नाही, हे येणारा काळच सांगू शकेल. त्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही; परंतु, अर्धवट राहिलेली कामे पाहता हा धोका दूर नाही. पाऊस नसताना रस्ते खचले मग पावसाळ्यात काय संकट ओढवेल, याचा विचारच न केलेला बरा, अशी भीती पर्रीकर यांनी व्यक्त केली.