लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकऱ्या देताना उमेदवारांची गुणवत्ताच लक्षात घ्यायला हवी. गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकरी द्यायला हवी. मेरिट लिस्ट तयार करून ती लिस्ट जनतेसमोर ठेवावी, तरच नोकरी घोटाळे भविष्यात टळतील, अन्यथा घोटाळ्यांची पुनरावृत्ती होण्याचा धोका कायम राहील, अशी प्रतिक्रिया उत्पल मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी व्यक्त केली.
सरकारी नोकऱ्यांची प्रक्रिया पारदर्शक करावी लागेल. त्यासाठी बारावीच्या परीक्षेप्रमाणे पद्धत स्वीकारावी लागेल. गुणवत्ता यादी ही पारदर्शक असावी लागेल. उत्तरपत्रिका व मेरिट लिस्ट हे खुले करावे लागेल, ते गुप्त ठेवू नये. एखाद्याला जर मुलाखत व परीक्षेनंतरही सरकारी नोकरी मिळाली नाही तर त्याला उत्तरपत्रिका, मेरिट लिस्ट वगैरे पाहता यायला हवे. नोकरी प्रक्रियेस आव्हान देता यायला हवे, उमेदवारासाठी तशी सोय हवी. जर नोकरी प्रक्रिया उघड व पारदर्शक झाली नाही तर सरकारी पातळीवरील घोटाळे टाळता येणार नाहीत, असे उत्पल पर्रीकर 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.
प्रक्रिया खुली झाली तरच भरतीला अर्थ...
नोकरभरतीसाठी राज्य कर्मचारी निवड आयोग ही कल्पना योग्य आहे, पण त्या आयोगाची प्रक्रियाही खुली व पारदर्शक करावी लागेल. जर तिथे सगळे काही गुप्त पद्धतीने घडू लागले व उमेदवारांना मेरिट लिस्ट किंवा उत्तरपत्रिका पाहण्याची व्यवस्था नसेल तर मग घोटाळ्यांची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीची पद्धत स्पष्ट, उघड व पारदर्शक करावी लागेल. मेरिट लिस्ट जर आयोगाने तयार केली व त्यात कुणाची लुडबूड झाली नाही तरच घोटाळे थांबू शकतील, असेही उत्पल म्हणाले.